इंदापूर तालुक्यातील पवारवाडीच्या ग्रामसेविकेकडून लाखोंची अफरातफर; तक्रार करूनही प्रशासन ढिम्मच!
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील मौजे पवारवाडी येथील ग्रामसेविका श्रीमती जी. एस. आटोळे यांनी २०१८ ते २०२५ या कालावधीत शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर व अफरातफर केल्याची खळबळजनक तक्रार समोर आली आहे.
याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आता ‘भारतीय दलित पॅन्थर’ने आक्रमक पवित्रा घेत ग्रामसेविकेच्या तातडीच्या बदलीची मागणी केली आहे.
*नेमके प्रकरण काय?*
जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विठ्ठल काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामसेविका आटोळे यांनी त्यांच्या कार्यकाळात खासदार आणि आमदार निधीसह शासनाच्या विविध विकास योजनांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे. विकासकामे केवळ कागदावर दाखवून निधी हडप केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
*घरकुल आणि शौचालय योजनेत अनियमितता*
शासनाच्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी न करता किंवा जिओ-टॅगिंगसाठी आवश्यक फोटो न काढताच घरकुलाचे पुढचे हप्ते मंजूर करण्यात आले.
इतकेच नाही तर, अनेक अपात्र व्यक्तींना नियमबाह्य पद्धतीने घरकुल व शौचालय अनुदान मिळवून देऊन शासकीय नियमांना हरताळ फासल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
*प्रशासकीय दिरंगाईवर संताप.*
या भ्रष्टाचाराबाबत विठ्ठल काळे यांनी सर्वप्रथम ११ जानेवारी २०२३ रोजी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
कार्यवाही होत नसल्याने २ जून २०२५ रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले, तरीही प्रशासन ढिम्मच राहिले.
*भारतीय दलित पॅन्थरची उडी:*
आता या प्रकरणात भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष अंबादास सैदू शिंदे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी ३० जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनाला निवेदन दिले असून, संबंधित ग्रामसेविकेची पुणे जिल्ह्याबाहेर तातडीने बदली करावी आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे
.*प्रशासनाची उदासीन भूमिका*
प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे पवारवाडी ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, आता वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






