शरद पवार साहेब भाजप सोबत चालले. आज छत्रपती संभाजीराजे कुठे आहेत?
पूर्वी पेशव्यांची नेमणूक छत्रपती करायचे. आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करत आहेत. अश्या आशयाची जहरी जातियवादी किनार असलेली टीका पवार साहेबांनी संभाजीराजे खासदार झाले तेंव्हा केली. असली टीका अजित पवार भाजप सोबत जाताना पवारांनी केली नाही. स्वतःला पद्म विभूषण घेताना केली केली नाही. पण एका कर्तबगार युवराजाचे खच्चीकरण करायला मात्र पवार अजिबात मागे हटले नाहीत.

त्याचे करण मला सांगावे वाटते आहे. कारण मी स्वतः या राजकीय घडामोडींचा साक्षीदार आहे. मला आठवते संभाजीराजे खासदार झाल्यावर पहिल्यांदाच तुळजापूर ला कुलस्वामिनीचे दर्शन घ्यायला आले होते. तिथे पत्रकारांनी राजेंना प्रश्नांची सरबत्ती करून भांडावून सोडले. मी नवीन होतो हा प्रकार नेमका काय हे मला हळू हळू समजू लागले. मी थोडा खोलात जाऊन अभ्यास केला.
अन मला लक्षात आले की राज्यात पुरोगामी चळवळींच्या आडून काहीलोक स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. असो पवार साहेबां च्या टीके नंतर काही कथित पुरोगामी टोळ्या सक्रिय झाल्या आणि शिवशाहूंच्या या वारसदाराचे यथेच्छ खच्चीकरण केले जाऊ लागले. ज्या लोकांच्या सोबत राजे महाराष्ट्रभर दौरे करत होते. एकत्र चटणी भाकरी खाऊन प्रेमाचे संबंध तयार करून चळवळीसाठी झटत होते. त्यांच्यापैकी पवारांच्या जवळच्या राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन संभाजीराजेंच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट केले.
विशेष म्हणजे कोल्हापूरात पवारांचा एक खास माणूस छत्रपती घराण्यात कलह माजवण्यासाठी प्रयत्न करू लागला. व्ही बी पाटील असे त्यांचे नाव. संभाजीराजे खासदार झाल्यापासून पवारांच्या इशाऱ्यावरून त्यांनी वडील शाहू महाराजांच्या जवळ चुकीची माहिती पेरण्यात भूमिका बजावली. व्हीबी सारखे अनेक चापलूस जोपर्यंत छत्रपती घराण्यात वावरतील तोपर्यंत कोल्हापूर च्या राजकारणात राजघराण्यातील लोकांचे अस्तित्व तयार होणार नाही. हे मी राजेंना अनेकवेळा बोललो.
इथपर्यंत राजकारण केले की कालच्या वेळेस काँग्रेस पक्ष संभाजीराजेंना कोल्हापूर मधून लोकसभेची उमेदवारी द्यायला तयार झाले होते. अश्या लोकांच्या माध्यमातून शाहू महाराजांना उभे करण्यात आणि राजेंना डावलून त्यांना तिकीट देण्यात भूमिका निभावली. वडील आणि आपल्यात मतभेद होऊ नयेत यासाठी राजेंनी ताकदीने प्रचार केला. स्वतःचे करिअर डावलले.खासदार शाहू महाराज हे पुरोगामी विचारांशी बांधील आहेत हे मला मान्य आहे.
परंतु पवारांच्या पुरोगामित्वाविषयी त्यांचा असलेला गैरसमज मला तेंव्हाही मान्य नव्हता आजही नाही. छत्रपती घराण्यातील कोणताही वारस मुख्य प्रवाहातील राजकारणात उतरू नये, उतरला तर टिकू नये याची खबरदारी स्वतंत्र भारतात कोंग्रेसी लोकांनी घेतली. यशवंतराव ते शरद पवारांचा तो डाव या लोकांना समजला नाही. ब्रिटिशांची नीती होती की सामान्य जनतेच्या मनात राज घराण्याच्या विषयी प्रचंड आस्था आहे. ते लोक जर जनतेत उतरले तर आपल्याला सत्ता गाजवणे अवघड होईल. तेच धोरण कांग्रेस ने पुढे चालू ठेवले.
परंतु देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यातील तुलनेने युवा असलेल्या आणि महाराष्ट्रभर ज्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. अश्या संभाजीराजेंना राष्ट्रपती नियुक्त खासदार करून मुख्य प्रवाहातील राजकारणात आणण्याचा प्रयोग केला. त्याचे चांगले परिणाम झाले. पूर्वी केवळ ब्राह्मण बनियांची पार्टी म्हणून भाजपकडे पाहिले जायचे. त्यांना आता बहुजनांचा आधार वाढवून घेता येऊ लागला. राजेंच्या नंतर कांग्रेस, राष्ट्रवादी मधील अनेक राजकीय घराण्यातील लोकांनी भाजपात यायला सुरुवात केली.
आज सातारचे एक वारसदार राज्यात मंत्री आहेत. एक खासदार आहेत.परंतु संभाजीराजे हे केंव्हाच केंद्रात मंत्री झाले असते. तश्या बोलण्या सुरू झाल्या होत्या. चंद्रकांत दादा पाटलांनी तर राजवाड्यात जाऊन तसे वक्तव्य केले होते. अनेक महत्वपूर्ण नेत्यांचे मला फोन येऊ लागले. पण संभाजीराजेंनी मंत्री पदासाठी नकार दिला. का? तर केवळ आपले वडिल नाराज होतील म्हणून.
आपण राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतली तर इतके मानसिक त्रास दिले जात आहेत. आपण जर मंत्री पद घेतले तर महाराज अधिक नाराज होतील. या गोष्टी राजेंनी माझ्याकडे बोलून दाखवल्या होत्या. बर संभाजीराजेंनी आरएसएस च्या स्टेज वर जाणार नाही ही भूमिका मनापासून ठेवली होती. तशी ती त्यांनी देवेंद्रजींना देखील सांगून ठेवली होती. ती अट भाजपला मान्य देखील होती. पण पक्षाच्या दैनंदिन घडामोडीत देखील राजेंनी यावे असे त्यांचे म्हणणे नव्हते. पण भाजपचे कधी नावही न घेणे हे भाजपला पसंत येणे शक्य नव्हते.
पुढे जे व्हायचे ते होऊन गेले. त्या खासदारकीचा वापर संभाजीराजेंनी गड किल्ल्यांसाठी केला. खासदारकीचा उपयोग मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय संसदेत मांडण्यासाठी केला. सर्व पक्षीय खासदारांना एकत्रित आणून पुरोगामी विचार सांगणाऱ्या राजर्षींची जयंती पुण्यतिथी संसदेत साजरी करण्यास सुरुवात केली. दिल्लीत तेथील मराठी बांधवांना एकत्र करून ऐतिहासिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर चे विमानतळ पुन्हा सुरू करण्यात केला. शिवाजी पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून घेण्यात केला. ध्यानचंद स्टेडियम ला टर्फ लावून देण्यात केला.
कोल्हापूर च्या क्रिकेट साठी केला. आमच्या तुळजापूर ला रेल्वे मंजूर करून दिली.कोल्हापूर घराण्याची राजर्षी शाहूं महाराजांची किर्ती जगभरात घेऊन जाण्यासाठी राजेंनी खासदारकीचा वापर केला. त्याची दखल पोलंड देशाने घेतली. त्यांनी त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने संभाजीराजेंना गौरविले. पण महाराष्ट्राच्या राजकारणातून आज हा माणूस थोडासा बाजूला थांबला आहे. जसा दशरथा च्या इच्छेसाठी रामाने राजकीय वनवास भोगला त्याच प्रमाणे आधुनिक युगातील राम संभाजीराजे आहेत. केवळ शाहू महाराजांचे मन दुखावू नये,
यासाठी राजे अनेकदा थांबले. माझ्या वडिलांपेक्षा ते छत्रपती आहेत, छत्रपतींची मर्जी मी राखू नये? तर दुसऱ्यांकडून ती अपेक्षा कशी करावी? या एकाच गोष्टीसाठी संभाजीराजे विजनवासात आहेत. ज्यांनी खच्चीकरण केले ते शरद पवार साहेब आज भाजप सोबत जात आहेत. आणि एक निस्पृह राजपुत्र राजकारणापासून अलिप्त असल्याचे बघून मन दुःखी होते.
adv योगेश केदार 9823620666







