अकलूज नगरपरिषद निवडणूक मतमोजणी साठी प्रशासनाची जय्यत तयारी
अकलूज (प्रतिनिधी) अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीची मत मोजणी दि.२१ डिसेंबरला होत असून,त्यामध्ये जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
प्रशासनानेही मत मोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी केली असून साधारण २ तासात निकाल हाती येतील अशी माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली आहे.नगर परिषदेच्या क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.मतमोजणीत एकूण १३ प्रभागापैकी प्रथम १ ते ७ प्रभागाची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर ८ ते १३ प्रभागाची मतमोजणी होईल प्रभागाच्या मतमोजणी सोबतच नगराध्यक्षपदाची मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत२६ नगरसेवक व १ नगराध्यक्ष पदासाठी एकूण ९१ नगरसेवक ५ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत.
शहरातील ३४४०८ पैकी एकूण पुरुष १२१६१, स्त्री ११६५० व इतर ६ मिळून २३८१७ एवढे मतदान झाले आहे.
मतमोजणीसाठी ७ टेबल असून प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी आणि फेर मोजणी,संगणक व मतदान यंत्र ने आण करण्यासाठी २५ मिळून ४६ कर्मचारी अधिकारी नियुक्त केले आहेत.संपूर्ण निकाल प्रक्रिया सुमारे अडीच ते तीन तासात पूर्ण होऊन दुपारी १२:३० वाजेपर्यत संपूर्ण माहिती हाती येईल असा विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.







