अकलूज नगरपरिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार?
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ग्रामपंचायतीची स्थापना साधारण १९२२ साली झाली होती.म्हणजेच जवळपास 97वर्षे शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव या ग्रामपंचायत वर दिसून येतो.१९२२ ते १९५६-५७ या काळापर्यंत अकलूज हे एक अगदी छोटस गाव होत.
वर्षानुवर्ष दुष्काळी परिस्थिती, वीज, पाण्याची सोय नव्हती. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे लोक गाव सोडून कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी यायचे.त्यानंतर इथे सुपरवायझिंग युनियनच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून शंकरराव मोहिते पाटील स्वातंत्र्य चळवळीतून राजकीय मैदानात आले. पुढे त्याच दरम्यान ते अकलूजचे सरपंच झाले, आणि इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द चालू झाली
. त्यानंतर ६० च्या दशकात त्यांचा मुलगा आणि राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील बराच काळ इथले सरपंच होते.तेव्हा पासून आलटून पालटून मोहिते पाटील घराण्याचंच इथे वर्चस्व आहे.धैर्यशील मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील हे देखील सरपंच होते.
शंकरराव मोहिते पाटील यांच्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतीचा आणि गावाचा चांगला विकास झाला. त्यांना या गोष्टीची पक्की खात्री होती की, लोकांच्या हाताला काम मिळालं नाही तर गावाचा विकास होणार नाही.
त्यामुळेच १९६२ च्या दरम्यान सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा जन्म झाला. जवळच असलेल्या चितळेनगरचा चितळ्यांचा प्रसिद्ध साखर कारखाना १९६८ च्या दरम्यान ३७.५ लाखाला विकत घेतला आणि तो सहकारी केला.मोहिते पाटील यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साहाय्याने “घरटी तेथे गाय” हि योजना राबवली. परराज्यातुन जर्सी होस्टन जातीच्या अधिक दुध देणाऱ्या गायी या ठिकाणी आणल्या. त्यामुळे शेतकरी, कामगार, सर्व सामान्य नागरीक यांच्यासोबत घरच्या महिलांना देखील हाताला काम मिळाले. घरोघरी गाय, कोंबडी पालन हा व्यवसाय सुरू झाला.
पण जोपर्यंत ग्रामपंचायतीच स्वतःच ठोस उत्पन्न असल्याशिवाय गावचा विकास होणार नाही. हे तत्व मांडले आणि ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दुकान गाळ्यांच्या निर्मितीला सुरुवात झाली. हळू हळू या दुकान गाळ्यांची संख्या वाढत आजच्या घडीला ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जवळपास विविध मालाचे 2000 पेक्षाही अधिक दुकान गाळे असून 1500इतर व्यापारी यांचे व्यवसाय चालतात.
अकलूजच्या नागरीकांसाठी ग्रामपंचायतीच्या फंडातुन व शासकीय स्तरावरून त्यांना आवश्यक असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन त्याच नियोजन करून लोकांसाठी काम केलं गेलं.
त्यानंतर २०११-१२ पासून नगरपंचायत किंवा नगरपालिका करण्याची मागणी पुढे येवू लागली. शासनाच्या नियमानुसार नगरपालिका होण्यासाठी ४० हजार लोकसंख्या असणं आवश्यक होत. २०११ च्या जनगणेनुसार अकलूजची लोकसंख्या ३९ हजार ९१९ इतकी होती.त्यानुसार २०१७ मध्ये प्रशासनाने माळेवाडी आणि अकलूज ग्रामपंचायतीच एकत्रीकरण करून नगरपालिकेत रूपांतर करण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवला होता.
अकलूजचे तत्कालीन सरपंच शिवतेज मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये सांगितल्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यानंतर सलग 43दिवसांचे साखळी उपोषण केल्यानंतर 3ऑगस्ट 2021रोजी अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायत मिळून एकत्रिपणे नगरपरिषद मध्ये रूपांतर झाले.तेव्हापासून तब्बल 4वर्ष या नगरपरिषद चा कारभार प्रशासक पाहत होते.
असे असले तरी अकलूज नगरपरिषद हद्दीतील विकासासाठी मोहिते पाटील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून विकास निधी आणला, तसेच विकासकामे सुद्धा केली.
आता मात्र 2025मध्ये नगरपरिषद ची निवडणूक जाहीर झाली आहे.अकलूज नगरपरिषद च्या पहिल्या निवडणुकी च्या रिंगणात उतरण्यासाठी आता अनेक आघाड्या सज्ज झाल्या आहेत.महायुती, महाविकास आघाडी, तसेच इतरही गटाकडून अकलूज नगरपरिषद वर आपलाच विजय होणार असे सांगितले जात आहे.आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून13प्रभाग मधून 26नगरसेवक निवडले जाणार आहेत. तर नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे. 10नोव्हेंबर ते 17नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.18तारखेला अर्जाची छाननी होणार आहे. 19ते 21तारखे पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. काही तक्रार असल्यास 21ते 25दरम्यान अपील करता येणार आहे.26नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.2डिसेंबर रोजी सकाळी 7-30ते 5-30या वेळेत मतदान होणार असून, 3डिसेंबर रोजी सकाळी 10वाजलेपासून विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे मतमोजणी होणार आहे.
दरम्यान अकलूज नगरपरिषद वर सत्ता कोणाची येणार? हे 3डिसेंबर लाच समजेल. एव्हढे मात्र निश्चित.







