

अकलूज – अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणुक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने १९७५ साली संविधान बदलण्याचे पाप केले. आता त्यांचा नातु भाजपावर संविधान बदलणार असल्याचा आरोप करतो आहे. संविधान तर तुम्ही बदलले. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला आणि निवडणुका जिंकल्या पण त्यांनी आदिवासी, दलित आणि गरीबांची गरीबी न हटवता आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून स्वतःच्या बगलबच्चांची गरीबी हटवली. त्यामुळेच भारताची प्रगती होऊ शकली नसल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी अकलूज येथील जाहिर सभेत केला.


भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका विधानसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अकलूज येथील विजय चौकामध्ये नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राजकुमार पाटील, संजिवनी पाटील, संस्कृती सातपुते, अॅड. बी. वाय. राऊत, आप्पासाहेब देशमुख, बाजीराव काअकर, के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, हनुमंत सुळ, शरद मोरे व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, काँग्रेस जे गत ६० वर्षात करू शकली नाही ते आम्ही पक्त १० वर्षात केले. देशाला स्वयंपुर्ण, आत्मनिर्भर व संरक्षण क्षेत्रात खंबीर केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवून संपुर्ण देशातील खेडी शहराला जोडण्याचे काम केले. येणाऱ्या काळात गावे समृध्द आणि संपन्न करण्याची योजना पक्त भाजपाचे सरकारच राबवू शकते. या भागातील टेंभु आणि म्हैसाळ या पाणी उपसा सिंचन योजनांना मी निधी दिल्यानेच या योजना सुरू झाल्या आहेत. या देशातील शेतकरी अन्नदात्या बरोबरच इंधनदाता कसा होईल या दृष्टीने केंद्रीय सरकार पावले उचलत आहे. तरूणांची बेरोजगारी घालवून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी विविध योजना आखत आहे. सिंचनाला प्राधान्य दिले जात असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
आपले प्रतिस्पर्धी उमेदवार उत्तमराव जानकर यांच्यावर टिका करताना राम सातपुते म्हणाले, समोरच्या उमेदवाराकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे हा उमेदवार जाती-पातीचे राजकारण करत आहे. स्वतःच जातीवादी भाषणे ठोकून भाजपाला बदनाम करण्याचे काम करतो आहे. हा उमेदवार आपल्या निवडणुकीच्या खर्चासाठी अकलुज शहरातील डॉक्टर व व्यापारी यांना धमक्या देवून खंडणी मागतो आहे. माळशिरसची निवडणुक ही ऐतिहासिक आहे. एका बाजुला आम्ही केलेल्या विकास कामांचा दाखला देवून जनतेला मते मागत आहोत तर दुसऱ्या बाजुला लोकांना धमकावून, जाती जातीत द्वेष निर्माण करून मते मागितली जात आहेत. गडकरी साहेबांनी माळशिरस तालुक्यातील २२ दुष्काळी गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी निरा-देवधरचे पाणी मिळावे याकरीता मदत करावी.
त्याचबरोबर या माळशिरस तालुक्यातील तरूणांच्या हाताला काम मिळावे याकरीता या भागात ५ स्टार एमआयडीसी उभारण्यासाठी मदत करावी. या भागाचा विकास करण्यासाठी या तालुक्याला गडकरींनी दत्तक घ्यावे अशी विनंती राम सातपुते यांनी केली.







