माळशिरस विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाची भूमिका निर्णायक
अकलूज (प्रतिनिधी )२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघात बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामध्ये उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट),राम विठ्ठल सातपुते (भारतीय जनता पार्टी),सूरज अशोक सरतापे (बहुजन समाज पार्टी),राज यशवंत कुमार (वंचित बहुजन आघाडी),प्रा.डाॅ.सुनिल सुखदेव लोखंडे (राष्ट्रीय समाज पक्ष),अरूण मनोहर धाईंजे (अपक्ष),कुमार दादा लोंढे (अपक्ष),दादा विश्वनाथ लोंढे (अपक्ष), मनोजकुमार उत्तम सुरवसे (अपक्ष), रमेश अंकुश नामदास (अपक्ष), सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष), त्रिभुवन विनायक धाईंजे (अपक्ष) हे बारा उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार पैकी 40%मतदार हे मराठा समाजाचे आहेत. म्हणजेच मराठा समाजाची निर्णायक मते आहेत.सध्या सर्वत्र मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळावे. या मागणी साठी सर्वत्र उपोषण, आंदोलन होत आहेत. माळशिरस तालुक्यात देखील या अनुषंगाने अनेकवेळा साखळी उपोषण,आमरण उपोषण रास्ता रोको, कॅण्डल मार्च,करण्यात आले आहे.
यावेळी सद्य स्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांनी अपवाद वगळता कधीही मराठा समाजाच्या आंदोलनात अथवा उपोषणास भेट दिली नाही.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील मराठा समाज आता आक्रमक झाला असून आपण नेमके कोणाला मतदान करायचे, मतदान करायचे की नाही. असा नाराजीचा सुर उमटत आहे.काही बांधव आपण नोटा ला मतदान करू असे सांगत आहेत. तर काही सरळ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थिती मध्ये आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या पुढील आदेशाची वाट पाहू असेही काहींचे म्हणणे आहे.आजपर्यंत मराठा समाजाने आजपर्यंत च्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान केले आहे.परंतु आता तसे होणार नाही.
जो उमेदवार मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण मिळवून देण्याची भूमिका घेईल. व तसे जाहीरपणे सांगेल. त्यालाच आम्ही मतदान करू. असा सुर उमटत आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा 2009पासून राखीव आहे.गेल्या तीन टर्म ला आपण स्वर्गीय हनुमंत डोळस यांना दोन वेळा तर 2019ला राम सातपुते यांना या मतदार संघातून निवडून दिले आहे.या दोघांनीही मराठा समाजासाठी व आरक्षण साठी अपवाद वगळता काही केले आहे. असे म्हणता येणार नाही.राम सातपुते यांनी एक दोन वेळा सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता.
आता 2024ची निवडणूक होत आहे.माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान पैकी जवळपास 40%मतदान आपल्या मराठा समाजाचे आहे. म्हणजेच आपले मतदान निर्णायक आहे. मराठा समाजाच्या मतांवर एखादा उमेदवार हरू ही शकतो. आणि जिंकूही शकतो. त्यामुळे नेमके काय करायचे याबाबत सल्ला मसलत केली जात आहे.
सद्य स्थितीत मतदारसंघात 12उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा आरक्षण यासंदर्भात यापैकी एकाही उमेदवाराने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही.मग असे असताना नेमके काय करायचे. कोणाच्या पाठीमागे उभा राहायचे. कोणाला मतदान करायचे? काही बांधव म्हणतात नोटा ला मतदान करायचे. आणि मतदानाचा पवित्र हक्क बजवायचा.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला असता. तर मराठा समाजाच्या वतीने आपल्या विचाराचा उमेदवार निश्चितपणे उभा केला असता. परंतु तसे झाले नाही.किंबहुना नेमके कोणाला मतदान करायचे आणि कोणाला पाडायचे यासंदर्भात पाटील यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.
त्यामुळे उभे असलेल्या उमेदवारांनी आपली आरक्षण संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. जो उमेदवार आपली भूमिका स्पष्ट करेल त्यालाच मतदान केले जाईल.अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.







