खाकी वर्दीतील भला माणूस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
अकलूज (गणेश जाधव )राज्याच्या गृह विभागाने भा.पो.से., रा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल्यांचे आदेश काढले आहेत.
तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर 22 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती झाली होती. सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे 2015 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
अतुल कुलकर्णी म्हणजे सदरक्षणाय , खलनिग्रहणाय,हे पोलिस खात्याचे ब्रीदवाक्य सार्थ ठरावे ,अशीच त्यांची प्रामाणिक व धाडसी कार्यपध्दत राहिली आहे.त्यामुळेच त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे.
सरकारी नोकरी म्हणजे अमाप पैसा मिळवणे नव्हेतर जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याची भगवंताने दिलेली ती एक चांगली संधी आहे ,याच भावनेतून कार्यरत राहून त्यांनी आपल्या कारकिर्दीत चांगुलपणाने जीवाभावाची खूप माणसे मिळवली आहेत, आणि हीच माझी आयुष्यभराची सुखाची खरी कमाई आहे,अशीच त्यांची प्रांजळ भावना आहे.
खरंतर माणसाचं मोठेपण हे त्याच्या कर्तृत्वातून ठरत असते.यामध्ये आपण समाजाला काय देतो ,यावरुनही जगण्याची श्रीमंती ठरते.म्हणून आपल्याकडे जे काही चांगले असेल ते निरपेक्ष भावनेने समाजाला देत राहणे म्हणजे दातृत्वातून पुण्य मिळवणे असते असे ते मानतात.
धाराशिव येथे कार्यरत असताना पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी असली तरी एक वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत ते नागरिकांना भेटत होते.त्यांचे प्रश्न सोडवत होते . थेट, साहेबांपुढेच प्रश्न मांडल्यामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागले.
पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी घेतल्यानंतर गुन्हेगारी कशी कमी होईल, याकडे प्रथम लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे काही दिवसातच चित्र दिसू लागले. धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. पथदिवे सुरू केले.
थोडक्यात, विस्कळीत झालेली घडी बसवण्यावर लक्ष दिले आणि अंमलबजावणी सुद्धा केली.पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी म्हणजे जणूकाही तारेवरची कसरतच असते.अनेकदा कटू निर्णय घ्यावे लागतात. कारण, तसे केल्याशिवाय शिस्त लागत नाही. प्रेम, कठोरता, आपुलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी ते अमलात आणत असल्याचे समजले.
एखाद्या कर्मचाऱ्याला दंड करायचा असेल तर तो म्हणजे ५०-१०० झाडे लावण्याचा दंड करत असत.कर्मचाऱ्यांपासून ते पोलिस अधिकारी मनमोकळे पणाने त्यांच्याशी बोलतात. आपले प्रश्न मांडतात. दोन्ही बाजूंनी संवाद होत असल्यामुळे आदरयुक्त भिती आणि त्यापेक्षा प्रेमाणेच ते जिंकत असल्याचे अनेकांनी सांगितले.
निसर्गप्रेमी असलेले कुलकर्णी यांनी जिल्ह्यात विविध प्रकारची लाखो झाडे लावली.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी फासेपारधी नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले.फासेपारध्यांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. ना भारताचा रहिवासी, ना आधार कार्ड ना रेशन कार्ड. त्यांच्या साठी काम करण्याचे ठरवल्यानतंर पोलिसांना पाहून फासेपारधी पळून जात. पण, अतुल कुलकर्णी हे स्वतः त्यांच्यात मिसळले. त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना आधार दिला. विशेष म्हणजे फासेपारधी स्वतः त्यांच्याकडे येत होते.अनेक फासेपारध्यांची कागदपत्रे तयार करून दिली आहेत. युवकांना चोरीतून बाहेर काढून नोकऱ्या लावून दिल्या आहेत. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे फासेपारधी आणि त्यांच्यात माणुसकीचे नाते निर्माण झाले होते.त्यांनी त्यांच्या साठी अनेक योजना राबविल्या.
धाराशिव आणि सोलापूर शेजारी शेजारी असल्यामुळे त्यांनी तेथे केलेले काम सोलापूरकराना चांगलेच परिचयाचे आहे.सोलापूर ची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यापुढे खरे तर अनेक आव्हाने असणार आहेत. परंतु ही सर्वं आव्हाने ते लिलया पेलतील एव्हढीच सोलापूर वासियांची माफक अपेक्षा आहे.






