वेळापूर येथील साठे कुटूंबातील वृद्ध व अंध कुटूंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील नव्वदीकडे वाटचाल करणारे सोपान गंगाराम साठे(वय 85वर्षे )व सुभद्रा साठे (वय 83वर्षे )हे पती -पत्नी यांच्याकडे पाहिले कि सुखी संसार म्हणजे काय याची प्रचिती येते.आजीबाई संसाराचा गाडा ओढून-ओढून वाकून गेली आहे. तर आजोबा घराचा कारभार करत आज त्यांच्या दोन्ही डोळ्यांना गेल्या सहा महिन्यापासून दिसत नाही.पण आजींची खंबीर साथ असल्यामुळे आजोबा आजीच्या काठीचा सहारा घेत गावागावात उदरनिर्वाह करण्यासाठी फिरत आहेत.भारतीय संस्कार व संस्कृतीची शिदोरी जपण्याचे काम हे वयोवृद्ध आजी आजोबांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साठे कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षापासून माळशिरस तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वेळापूर येथे गेल्या कित्येक वर्षापासून राहतात. त्यांना चार विवाहित मुली आहेत. तर एक जावई काही वर्षांपूर्वी वारले आहेत. आणि तीन जावई आहेत. तर सहा नातवंडे आहेत.परंतु हे दोघे पती -पत्नी पहिल्यापासूनच अतिशय स्वावलंबी आहेत. त्यामुळे उगाच आपला भार कोणावर नको म्हणून लेकीकडे न राहता. दोघेच वेळापूर येथे राहतात. त्यांना मुलगा नाही. केवळ चार मुली आहेत.या दोघांचे लग्न सत्तर वर्षांपूर्वी झाले. स्वतः दोघांनीही कष्ट करून आपल्या मुलींना लहानाचे मोठे केले.
कालांतराने त्यांची लग्न लावून दिली. त्यांची स्वतःची वेळापूर येथे तीन गुंठे जागा आहे. आपल्या मुलींची लग्न झाल्यानंतर या दोघांनीही वेळापूर येथील एका व्यापाऱ्याकडे आठवड्याला 1000₹पगारावर आठ वर्षे मोल मजुरी केली. विहिरी फोडण्या पासून ते पडेल ते काम केले. मात्र ज्याच्याकडे प्रामाणिकपणे काम केले. त्याने मात्र ठरविल्या प्रमाणे मोबदला दिला नाही. वेळोवेळी तूट पुंजी मदत केली. आठ वर्षाचा पगार दिला नाही.
या दोघांना राहायला स्वताचे घर देखील नव्हते. ज्याच्या कडे काम करीत होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी पत्र्याचे शेड मारून दिले. निवारा तर झाला. पण उदरनिर्वाह चे काय?
त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या पोटाला दोन घास मिळावेत. म्हणून हे दोघे पती -पत्नी दररोज वेळापूर येथून कधी एस. टी. ने तर कधी पायी चालत अकलूज ला येतात. कधी अकलूज, तर इंदापूर, पंढरपूर, टेंभुर्णी, माळशिरस या ठिकाणी पैसे असतील तर एस. टी. ने आणि पैसे नसतील तर पायी एकमेकांना काठीने आधार देत पायी प्रवास करतात. रस्त्यावर ये जा करणारे नागरिक कधी पैसे देतात. तर कधी खायला काही तरी घेऊन देतात.गेल्या सहा महिन्यापासून सोपान साठे यांच्या दोन्हीही डोळ्यांची दृष्टी गेली आहे.

परंतु अशाही अवस्थेत त्यांच्या पत्नी सुभद्रा साठे या आपल्या जवळ असलेल्या काठी च्या आधारे त्यांना साथ देत. पायी प्रवास करीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
आपल्या पतीच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी त्या दररोज कित्येक किलोमीटर पायी प्रवास करीत पैसे गोळा करीत आहेत.गरज आहे ती या कुटूंबाला सावरण्याची. त्यांना मदत करण्याची.संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरला आहे. परंतु अद्याप त्या योजनेचा लाभ मिळत नाही.
चौकट -या कुटूंबातील व्यक्ती सोपान साठे यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्या सहा महिन्यापासून गेली असून, त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी मदतीची नितांत गरज आहे.







