अकलूज नगरपरिषद अस्वच्छतेच्या विळख्यात. आरोग्य अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.




अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपरिषद मध्ये व्हावे म्हणून अकलूज मधील नागरिकांनी तब्बल 43दिवस साखळी उपोषण केले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी अकलूज नगरपरिषद झाली. आता आपल्याला चांगल्या नागरी सुविधा मिळतील अशी नागरिकांची अपेक्षा होती.
परंतु आता मात्र नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे अकलूज नगरपरिषद हद्दीत ठिकठिकाणी असलेली अस्वछता ही होय.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे थोडासा पाऊस पडला तरी अकलूज मधील गटारी तुडुंब भरून त्याचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या कित्येक महिन्यापासून या गटारी ची साफ -सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटारीत ठिकठिकाणी प्लास्टिक बाटल्या, तसेच इतर वस्तू अडकून पडल्या आहेत. त्यामुळे पाणी पुढे जात नाही.
अकलूज मधील सदुभाऊ चौक, जिजामाता कन्या प्रशाला, व्हेज ट्रीट हॉटेल या ठिकाणी असलेल्या गटारी कित्येक महिन्यापासून साफ केलेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावरून ये -जा करणारे नागरिक आणि शाळा -महाविद्यालय मध्ये येणारे विद्यार्थी यांना नाकाला हात लावून ये जा करावे लागत आहे. अस्वच्छ पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकलूज नगरपरिषद मध्ये काही महिन्यापूर्वी अक्कलकोट येथून नवीन आरोग्य अधिकारी आले आहेत. परंतु त्यांना याचे फारसे गांभीर्य नाही. त्यांनी पदभार घेतल्यापासून एकदाही गटारी ची साफ सफाई केली नाही.एव्हढेच नव्हे तर अकलूज मध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तो कचरा अनेक दिवस तसाच पडून असतो. त्यामुळे त्याच्या दुर्गंधी मुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.घंटा गाडी देखील नियमितपणे येत नसल्याने नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरांचा देखील मोठया प्रमाणावर वावर वाढला आहे. त्याचाही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे अकलाई मंदिर जवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंड वर देखील कचरा अस्तव्यस्त टाकला जातो. बऱ्याच वेळेस हा कचरा रस्त्यावर टाकला जातो. त्यामुळे या रस्त्यावरून ये -जा करणे नागरिकांना जिकिरीचे ठरत आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी टाकलेला कचरा अनेकवेळा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर आजाराला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी या गोष्टी ची गांभीर्याने दखल घेऊन अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व गटारी साफ करून त्या पूर्ववत कराव्यात. तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.








