अकलूज (प्रतिनिधी )येत्या गणेशोत्सव व ईद ए मिलाद बरोबरच सर्वच जाती धर्माच्या सण उत्सवात शांतता सलोखा राखावा,कोणी अशांतता निर्माण केल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिला आहे.
इद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकलूज उपविभागाच्या शांतता कमिटीची बैठक अकलूज पोलीस ठाण्याच्या अवारात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उप अधीक्षक सई भोरे पाटील, तहसिलदार सुरेश शेजवळ, अकलूज नगर परिषदेचे प्रशासक दयानंद गोरे, अकलूजचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, वेळापूरचे स.पो.नी. निलेश बागाव, नातेपुते चे स.पो.नी. प्रविण सपांगे,माळशिरस चे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले की,डीजे व डॉल्बीच्या आवाज मर्यादेसाठी शासनाच्या काही नियम व अटी आहेत.त्याचे उल्लंघन केल्यास डीजे वाजत येईल.पण परत माघारी जाणार नाही. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अधिकृत विज कनेक्शन घेणे, प्लेक्स बॅनर लावताना परवानगी घेणे गरजेचे आहे. लेजर लाईटचा मिरवणुकीत वापर करू नये. देखावे सकारात्मक आणि समाज प्रबोधनात्मक असावे. मंडपामध्ये अग्निरोधक उपकरणे असावीत. रस्ते ब्लॉक होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने मंडप उभारू नयेत. सगळीकडे विसर्जनाच्या मिरवणुकीची परंपरा आहेच. परंतु आता नव्याने प्रतिष्ठापणेच्या मिरवणुकीची परंपरा सुरू करू नका. सण व उत्सवाच्या काळात पोलीस यंत्रणांवर प्रचंड ताण असतो. शांतता व सलोखा राखून हा ताण तुम्हीच कमी करू शकता. आम्हाला सर्व रंग सारखेच आहेत. तुम्ही मात्र झेंड्यांची शेती आणि पुतळ्यांचा बाजार करू नका अशी ताकिद दिली. तर एक गाव एक गणपती बसवणाऱ्या गावांना पोलीस अधिक्षक कार्यालयाकडुन सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच गणेशोत्सव काळात आगमन आणि विसर्जन या दिवशी तालुक्यातील सर्व दारू दुकाने बंद राहतील. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे म्हणाले, सध्या निरा नदीमध्ये विसर्जनायोग्य पाणीसाठा नाही. त्यामुळे अपुऱ्या पाण्यामध्ये आपल्या गणेशमुर्ती विसर्जीत करून त्यांचे विटंबन होईल असे वागु नका. या मुर्ती नगरपरिषदेकडे सुपूर्त केल्यास योग्य जागी त्यांचे विसर्जन करण्यात येईल. पर्यावरण पुरक देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना नगर परिषदेकडुन बक्षिस देण्यात येईल.
गणेश विसर्जन व इद-ए-मिलाद ची मिरवणुक आमने सामने येऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने १ ऑक्टोंबर रोजी मिरवणुक काढण्याचे ठरले असल्याची माहिती भैय्या माढेकर यांनी दिली.
अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव व डीवायएसपी सई भोरे पाटील यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाबाबत अभिनंदन केले.






