अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी रोहित बाळासाहेब सूर्यवंशी यांचे खंडाळी येथे अपघाती निधन

अकलूज (प्रतिनिधी )पिकअप आणि दुचाकीच्या अपघातामध्ये अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी रोहित बाळासाहेब सूर्यवंशी (वय २९ वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या आई या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
हा अपघात माळशिरस तालुक्यातील अकलूज -सांगोला महामार्ग वर असलेल्या खंडाळी येथे शिंदे वस्ती जवळ 16सप्टेंबर रोजी झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (पिकअप क्र. एम एच ४५ एएफ ७८०३) ने रोहित सूर्यवंशी यांची दुचाकी( क्र. एमएच १३ बीई ४१७५ )ला जोराची धडक दिली. यामध्ये सूर्यवंशी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची आई या अपघातामध्ये जखमी झाली आहे.
यासंदर्भात वेळापूर पोलीस ठाणे येथे महेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अपघाताची नोंद झाली आहे.
रात्री उशिरा अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रोहित सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर रात्री साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,भाऊ, भावजय, एक मुलगा, तीन बहिणी असा परिवार आहे.
देव, देश, धर्म कार्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते.
त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी 18सप्टेंबर रोजी सकाळी 7वाजता अकलाई स्मशानभूमी येथे होणार आहे.






