अकलूज येथे ट्रक ने पाठीमागून धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू.प्रतापसिंह चौक ते माळेवाडी कॉलेज रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चा यांचे वतीने मागणी
अकलूज (प्रतिनिधी )25जुलै रोजी अकलूज येथील प्रतापसिंह चौकातून सायकल वरून आपल्या घरी जाणाऱ्या पोपट दाजी एकतपुरे( वय ५५ वर्षे) रा. शिवतेजनगर, देशमुखमळा, यशवंतनगर ता. माळशिरस यांना पाठीमागून येणाऱ्या अनिकेत अंकुश कवडे रा. कोळवडी ता. कर्जत जि. अहमदनगर यांच्या ट्रक ने( एम. एच. १६/सीसी ६०४८ )जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीव मृत्यू झाला.सदर ट्रक हा निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून भावाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याची व अपघात झाल्यानंतर तेथे न थांबता पळून गेल्याची फिर्याद रामचंद्र दाजी एकतपुरे (वय ४२ वर्ष) व्यवसाय सेन्ट्रींग रा. शिवतेजनगर,देशमुखमळा, यशवंतनगर ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी समक्ष पोलीस ठाणेस हजर राहुन दिली आहे.गु. र. नं.528/23प्रमाणे अकलूज पोलीस ठाणे येथे दाखल झाला असून, पुढील तपास शेख हे करीत आहेत.
दरम्यान या अपघात च्या पार्श्वभूमीवर प्रतापसिंह चौक ते माळेवाडी कॉलेज रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. अकलूज नगर परिषद हद्दीतील नागरिक व मराठा क्रांती ठोक मोर्चा माळशिरस तालुका समन्वयक आशुतोष ढवळे यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की,प्रतापसिंह चौक ते माळेवाडी कॉलेजच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे सतत अपघात होत आहेत. जानेवारी 2023 ते जुलै 2023 पर्यंत कित्येक लोकांचा अपघात होऊन बळी गेला आहे अशा घटनांमुळे कित्येक निष्पाप कुटुंबे उध्वस्त झाले आहेत.या रस्त्यालगत 2022 या वर्षात तब्बल 12 अपघात झाले असून 2023 या चालू वर्षात आत्तापर्यंत आठ अपघात झाले असून यामध्ये कित्येक लोकांचे बळी गेले आहेत. माळीनगर रोड ते प्रतापसिंह चौक या रस्त्यावर कॉलेजमधील तरुण-तरुणी व अन्य लोक वावरत असतात तरी आपण या रस्त्यावर त्वरित स्पीड ब्रेकर बसवावा,अशी मागणी या निवेदनाद्वारे अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना केली आहे.
चौकट :-
प्रतापसिंह चौकामध्ये पाच रस्ते एकत्र येतात,कोणत्याच बाजूला स्पीड ब्रेकर नाहीत. वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असतात, कोणतेही वाहन कुठून कसेही वळविले जाते, चालविले जाते,यावर कोणाचेच,कसलेच नियंत्रण नाही.अकलूजच्या पोलीस प्रशासनाने या चौकात कायमस्वरूपी दोन ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी कसे ठेवता येतील याचे नियोजन करावे तसेच अकलूजच्या नगरपरिषदेनेसुद्धा या चौकात सिग्नलची व्यवस्था करावी अशी अनेक वाहनचालकांची,नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.






