शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ज्ञानोबा- तुकोबा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान.- २४ हजार भाकरीचे वाटप , तर ९ हजार २०० विद्यार्थ्यांचा सहभाग.
अकलूज(प्रतिनिधी) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु तुकाराम, व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे २४ हजार भाकरी व १२५ किलो बेसनाचे पिठले, ठेचा लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात आले.
जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना . शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी दिपकराव खराडे पाटील संस्थेचे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील प्रमुख उपस्थित होते. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. २४ जुन रोजी अकलूज(जि.सोलापूर) येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी(जि.पुणे) येथे असतो. सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन कि.मी. असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. त्यांना घरगुती अन्नदान व्हावे या हेतूने सन २०१५ पासून शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. अन्नदान वाटपाचे हे ९ वे वर्ष आहे.या वाटपात संस्थेच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग शंकरनगर, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ७ हजार विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये १५ हजार भाकरी, ७० किलो पिठाचे बेसन पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असा ग्रामीण आस्वाद दिला. यावेळी मुख्याध्यापिका सुनिता वाघ, संजय गळीतकर,प्रा.राहूल सुर्वे, अमोल फुले,सौ सविता गायकवाड, शिवाजी पारसे, आदी उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मांडवे (ओढा) विसावा येथे ५ हजार भाकरी व २५ किलो बेसन, ठेचा, लोणचे असे अन्नदान केले.या यामध्ये सुमारे १ हजार२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असल्याचे मुख्याध्यापक पोपटराव देठे यांनी सांगितले. वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय व अर्धनारी नटेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवासाठी दि.२५ रोजी ४ हजार भाकरी, २० किलो बेसन, ठेचा, लोणचं असे अन्नदान दि.२५ रोजी होत आहे.या मध्ये १ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून प्रशालेचे सभापती सतीशराव माने देशमुख, अमरसिंह माने देशमुख व मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मुख्याध्यापक उरणे यांनी सांगितले.
दोन्ही पालखी सोहळ्यात संस्थेच्या वतीने सुमारे २४ हजार भाकरी, १२५ किलो बेसनचे पिठले, ठेचा, भाकरी ,लोणचे असे अस्सल ग्रामीण अन्नदान करण्यात येणार असून यासाठी ९ हजार२०० विद्यार्थी सहभागी आहेत.








