संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अकलूजनगरी सज्ज
अकलूज(प्रतिनिधी)अकलूज नगर परिषदेच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागताची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून,अकलूज नगरी संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली.गोरे पुढे म्हणाले, श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अकलूज मुक्कामी 24 जून रोजी येत असून, अकलूज नगरपरिषदेने तयारी सुरू केली आहे. पाणी पुरवठा, रस्ते व बेरेगेटींग, मंडप, दिवाबत्ती व आरोग्य विभागास नेमून दिलेली कामे पूर्ण झाली आहेत. शहरामध्ये वारकऱ्यांकरीता दिंडी मुक्काम ठिकाणी 10 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 4 ठिकाणी टँकर फिडींगची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील हातपंप व विहीरीमध्ये टी.सी.एल. टाकण्यात आले आहे. पालखी मार्गावर वाहनांची गर्दी होवू नये याकरीता योग्य ठिकाणी बॅरेगेटींग लावून मार्गावरील 6 ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली असून, डांबरीकरण करण्यात आले आहे. पालखी आगमनाच्या ठिकाणी सराटी पूल, गांधी चौक येथे स्वागत कमान उभारण्यात आली आहे. रिंगण सोहळ्याकरीता सदाशिवराव माने विद्यालय येथे लाकडी बॅरेगेटींग व मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्कामाचे ठिकाणी आपत्कालीन कक्ष, हिरकणी कक्ष व आरोग्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात आली असून धोकादायक वायर व पोलची दुरूस्ती करण्यात आली आहे. पालखी मुक्काम व आवश्यक त्या ठिकाणी 1000 शौचालये उभारण्यात आले आहेत. शहरामध्ये जंतुनाशक फवारणी केली असल्याचे गोरे यांनी सांगितले.
चौकट :-भाविकांसाठी खास एलईडीची सोयभाविकांना तुकाराम महाराजांचे सुलभ दर्शन व रिंगण सोहळा पाहता यावा. याकरीता फिरत्या 2 एलईडी व्हॅनची सोय करण्यात आली असून, भाविकांना हा पालखी सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहता येणार आहे.








