*महर्षी प्रशालेमध्ये महिला दिन उत्साहात साजरा*
*आदिशक्ती तू,प्रभूची भक्ती तू,झाशीची राणी तू,मावळ्यांची भवानी तू,प्रयत्नांनी लाभलेली उन्नती तू,आजच्या युगाची प्रगती तू*शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर प्रशालेत महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा राजगुरू यांनी केले .आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महिला अबला नसून सबला आहे हे सांगत देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये आज महिला कार्य करत असताना पाहावयास मिळतात हे नमूद केले .मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी सर्व महिलांना पुराणकाळातील आलेल्या मैत्रेयी व गार्गी ते आधुनिक काळातील राष्ट्रपती द्रौपदी मुरमु मधील महिला शक्तीचा जागर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्व महिला भगिनींच्या शुभहस्ते कै. अक्कासाहेब व राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. शिक्षिका मनोगतामध्ये नकोसा वाघमोडे यांनी महिलांचे विविध क्षेत्रातील नेत्रदीपक असणारे कार्य, कुटुंबाची जबाबदारी, शिक्षण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील कार्य यावरती प्रकाश टाकला. प्रशाला कमिटीचे सभापती जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे पाटील यांच्या शुभहस्ते सर्व महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला व त्यांनी सर्व महिलांना व विद्यालयातील मुलींना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनी मनोगतामध्ये समृद्धी बाबर हिने महिला दिनाचे महत्त्व सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विद्यालयात *संगीत खुर्ची* या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात प्रथम क्रमांक रचना रणनवरे व द्वितीय क्रमांक स्नेहलता एकतपुरे यांनी मिळविला. विद्यालयाच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रशाला समिती सदस्य, अनिल जाधव उप मुख्याध्यापक भारत चंदनकर, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली भोसले हिने केले व कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्वांचे आभार नाझिया मुल्ला यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.








