कृष्णानंद विद्यामंदिर परिवारात मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा
कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती ता.माळशिरस येथे दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी “मराठी राजभाषा दिन” म्हणजेच वि. वा. शिरवाडकर उर्फ “कुसुमाग्रज” यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी झाली. यावेळी ज्येष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कर्ते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल, ताशांच्या गजरात मराठी विश्वकोश ग्रंथांचे दिंडीच्या रूपात स्वागत केले व नाचत, उड्या मारत ग्रंथदिंडी साजरी केली. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनी कु. सृष्टी पाटील, सृष्टी वाघमारे, आरती कदम, यशोदा गायकवाड, प्रतीक्षा घुले या विद्यार्थिनींनी कृतीतून सुंदर असे काव्य सादरीकरण केले, तसेच चि.श्रीदत्त मोहिते, श्रावणी काटकर, श्वेता जाधव या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे कौतुक करत आपले मनोगत सादर केले तसेच या निमित्ताने इयत्ता पाचवी ते नववीतील सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक मराठी वाचन केले. प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. के. डी. मोरे मॅडम यांनी कवी कुसुमाग्रज व मराठी भाषेचा गोडवा व मराठी वाङ्मयातील विविध पैलू विषयी आपले मनोगत व्यक्त केले, शेवटी अध्यक्षीय मनोगतात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी विद्यार्थ्यांना मी मराठीत वाचन, लेखन, मनन, चिंतन करेन व माझी मातृभाषा मी समृद्ध करेन व माझी प्रगती करेन अशी प्रतिज्ञा दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका चेमटे मॅडम यांनी केले तर श्री आठवले सर यांनी आभार प्रदर्शन केले तसेच या कार्यक्रमासाठी श्री. रविराज गुरव सर, श्री. ढोले सर श्री. सय्यद सर सौ. मोरे मॅडम गायकवाड मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







