*पाटील वस्ती येथे “राष्ट्रीय विज्ञान दिन ” विविध उपक्रमांनी साजरा*
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती ता. माळशिरस येथे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी नोबेल पुरस्कार प्राप्त डॉ. सी. व्ही. रामन यांची जयंती म्हणजेच “राष्ट्रीय विज्ञान दिन” विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तोरणे सर तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून इ. ७ वी मधील विद्यार्थ्यांनी जीवनसत्व त्यामध्ये असणारे स्त्रोत व त्याचा उपयोग याचे प्रात्यक्षिक दाखवून सादरीकरण केले , तर इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती व त्यांचे विविध उपयोग कसे होतात याविषयी प्रत्यक्ष वनस्पती दाखवून माहिती सांगितली. त्यानंतर इ. ९ वी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी भोंदू बाबा व त्याने लोकांना केलेले चुकीचे मार्गदर्शन याविषयीची एक लघु नाटिका सादर केली व या चमत्कारांमध्ये विज्ञान कसे दडलेले आहे हे दाखवून दिले. प्रशालेच्या विद्यार्थिनी कु. मधुरा राक्षे, भक्ती देवकर, यशोदा गायकवाड यांनी विज्ञान दिन भाषण व विज्ञानावरील कविता सादर केल्या. प्रशालेच्या सहशिक्षिका सौ. देशमुख मॅडम यांनी सी व्ही रामन यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला व प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जरूर ठेवावा हे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. तोरणे सर यांनीही एक प्रयोग करून दाखवला त्यामध्ये साबण हळद यांचे मिश्रण लाल कसे हे प्रत्यक्ष कृती करून दाखवले व त्यामागील विज्ञान काय आहे हे सांगितले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विज्ञान ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना विविध भारतीय शास्त्रज्ञांची तसेच वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांची पुस्तके मांडण्यात आली यामधून विद्यार्थ्यांनी पुस्तक ,लेखक व त्यामधील विज्ञान यांचा आनंद घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेचे सहशिक्षक श्री. आठवले सर यांनी केले तर विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ. देशमुख मॅडम, श्री. दगडे सर, श्री. सय्यद सर, कु.पठाण मॅडम, ग्रंथपाल श्री. कुलकर्णी सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.







