अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच मिटींगला आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार-धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची राजधानी असलेल्या अकलूजमध्ये आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा व स्मारक उभारावे अशी मागणी सचिनभाऊ साठे यांच्या मानवहित लोकशाही पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सज्जनभाऊ लोखंडे व लहुजी शक्ती सेनेचे संदीप खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली अकलूजमधील मातंग समाजाच्या वतीने भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे करण्यात आली. तेव्हा अकलूज नगरपरिषदेची निवडणूक होताच पहिल्याच मिटींगला लहुजी वस्तादांच्या पुतळ्याचा व स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले. आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्रांतीचे जनक लहुजी वस्ताद साळवे यांनी ‘जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून अखंड ८७ वर्षे (आयुष्यभर) अविवाहित राहून तालीम, दांडपट्टा, लाठी काठी, तलवारबाजी, कुस्तीचे आखाड्यात प्रशिक्षण देऊन देशसेवेकरिता त्यांनी त्यांचे आयुष्य वाहिले. अशा महापराक्रमी लहुजींनी वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, उमाजी नाईक यांच्यासारखे असंख्य क्रांतीकारक घडवले. त्याच क्रांतीकारकांनी पुढे जाऊन लहुजी वस्ताद यांना गुरू मानून सशस्त्र क्रांतीचा लढा उभारला. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनीही त्यांना गुरूस्थानी मानले होते व देशातील पहिली शाळा सुरू केली होती. अशा थोर क्रांतीपिता क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकासाठी अकलूज येथे जागा उपलब्ध करून मातंग समाजाची अस्मिता राखून त्या स्मारकामधून सर्व समाजबांधवांनी प्रेरणा घ्यावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या स्तरावर हा विषय तात्काळ मार्गी लावून समाजाला न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन समाजाच्या वतीने मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सज्जनभाऊ लोखंडे, लहुजी शक्ती सेनेचे संदीप खंडागळे, मानवहित लोकशाही पक्षाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष पिंटू लोखंडे, आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव तुपसौंदर, रणजित मोहिते, आकाश साळुंखे, दादा गायकवाड, बापू मोहिते, बाळू एकतपुरे, देविदास लोखंडे यांच्यासह अनेक समाज बांधव व भगिनींनी दिले आहे. त्यांच्या या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन यासाठी जागेची पाहणी करण्याचे निर्देश धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच अकलूजमध्ये आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभे राहील याबाबत मातंग समाजातून आशावाद व्यक्त केला जात आहे.






