संग्रामनगर ग्रामपंचायत समस्याच्या विळख्यात.रस्त्यावरील खड्डे देतायत अपघाताला आमंत्रण.संग्रामनगर ग्रामपंचायत ला जाग कधी येणार?
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर ग्रामपंचायत ही समस्याच्या विळख्यात सापडली असून, गेल्या 7ते 8वर्षापूर्वी येथील सुमित्रा कॉलनी च्या पाठीमागे झालेल्या बिगरशेती प्लॉटिंग मधील नागरिकांना अनेक समस्या भेंडसावत आहेत, या ठिकाणी अनेक गोरगरीब नागरिकांनी प्लॉट खरेदी केले आहेत.सदरचे प्लॉट खरेदी करताना प्लॉट मालकांनी आम्ही तुम्हाला रस्ते, ड्रेनेज लाईन्स, लाईट, पिण्याचे पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते, परंतु गेल्या तीन चार वर्षापासून या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.सध्या या परिसरात सुमारे 10 ते 15 कुटुंबातील व्यक्ती वास्तव्य करीत आहेत, त्यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. या प्लॉट मधील दोन कुटूंबाच्या घरावरून महाराष्ट्र विदयुत वितरण ची लाईन्स गेली आहेत, त्यामुळे या कुटूंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदरचा प्लॉट खरेदी करताना आम्ही ही लाईन्स काढून देतो असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप ही लाईन्स काढण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता सदरचे प्लॉटिंग करताना लाईन्स काढणे आवश्यक होते, परंतु विदयुत वितरण कंपनी ने सदरचे प्लॉटिंग करताना ना हरकत पत्र दिलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे, या प्लॉट मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे येथील कुटूंबाना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय, या ठिकाणी पूर्वी कचरा कुंडी होती.परंतु यातील कचरा कधीच उचलून नेला जात नव्हता.. त्यामुळे कचरा कुंडी भरून कचरा आजूबाजूला पडलेला असायचा. त्यामुळे ती कचरा कुंडी परत उचलून नेली.त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरी येथील कुटूंबातील एका व्यक्तीला डेंग्यू झाला होता, त्यामुळे ग्रामपंचायत ने आठवड्यातुन किमान एकदा तरी येथील कचरा उचलून न्यावा. अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यमुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी दुसरीकडे जावे लागत आहे,त्याचप्रमाणे येथे असलेल्या घाणीच्या साम्राज्या मुळे या ठिकाणी गाढव, डुक्कर अशा मोकाट जनावरांचा वावर देखील वाढला आहे. त्याचाही येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.या ठिकाणी रस्ते आहेत, परंतु पावसामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत,त्यात मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.त्यामुळे जाणे -येणे जीकीरीचे ठरत आहे.या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, शालेय, महाविद्यालयीन तरुणांना या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे जिकिरीचे ठरत आहे. लहान मुले, महिला, वृद्ध यांना ये -जा करणे अवघड झाले आहे. अनेक नागरिक, महिला, विद्यार्थी या रस्त्यावरून टू व्हीलर घेऊन जात असताना घसरून पडले आहेत.त्यामुळे संग्राम नगर ग्रामपंचायत ने निदान या रस्त्यावर मुरूम तरी टाकावा. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. यापूर्वी येथील नागरिकांनी यासंदर्भात अर्ज देखील दिला आहे. तसेच प्रत्यक्ष भेटून मुरूम टाकण्या संदर्भात विनंती देखील करण्यात आली आहे. परंतु अद्याप ग्रामपंचायत ने दखल घेतलेली नाही. या रस्त्यावरून ये -जा करताना एखाद्याचा तोल जाऊन पडून इजा झाली तर त्याला जबाबदार कोण? का एखाद्याचा जीव जाण्याची ग्रामपंचायत वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.संग्रामनगर ग्रामपंचायत ने या गोष्टी कडे लक्ष देऊन सदर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.अशी मागणी जोर धरू लागली आहे.









