वेळापूर हद्दीतील शेती विकास महामंडळाच्या जमिनीमधून शासनाचा महसूल बुडवून बेसुमार मुरूम चोरी.
अकलूज /प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील वेळापूर हद्दीतील शेती विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या जमिनीमधून बेकायदेशीर मुरूम उपसा केला जात असून,संबंधीत शेती विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने वेळापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्याचे बोलले जात आहे. सदरचा मुरूम हा जेसीबी च्या साह्याने अंदाजे ५० ते ६० ट्रॉली भरून चोरून नेल्या आहेत. सदरचा मुरूम हा बहुतेक वेळापूर ग्रामपंचायतीने वेळापूर हद्दीत वापरल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्र शासन पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींना लाखो रूपये अनुदान देत असते. तरी सुद्धा सदर ग्रामपंचायतीने शेती विकास महामंडळाच्या जमिनीतुन विना परवाना व रॉयल्टी न भरता शासनाचा महसूल बुडवून मुरूम चोरून नेला आहे.एव्हढेच नव्हे तर माळशिरस तालुक्यातील इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे कोणतीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा होत आहे.वेळापूर ग्रामपंचायत ने विना परवाना व रॉयल्टी न भरता शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला आहे. वेळापूर ग्रामपंचायत चे संबंधित अधिकारी यांचेवर वेळापूर पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय व शेती विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी काय कारचाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








