*’हा माझा वैयक्तिक नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान’*
नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पद म्हणजेच राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्या देशातील 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांनी द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह इतर नेते संसद भवनात पोहचले. दरम्यान द्रौपदी मूर्मूंनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मूंनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी म्हटले की, देशातील तरुण आणि महिलांचे हित सर्वप्रथम जपले जाईल. या पदापर्यंत पोहचल्याने आपल्याला अभिमान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचणे, हा माझा वैयक्तिक सन्मान नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान आहे. मी देशाची पहिली अशी राष्ट्रपती आहे, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. संथाल क्रांती, पाईका क्रांती, कोल क्रांती आणि भील क्रांतीने स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी योगदानाला सशक्त केलं. तर भगवान बिरसा मुंडाजींच्या बलिदानाने आम्हाला प्रेरणा मिळाली.काही दिवसांपूर्वी भारताने कोरोना व्हॅक्सिनचे 200 कोटी डोस देण्याचा विक्रम केला. या लढाईत नागरिकांनी दाखवलेला संयम, सहयोग एक समाज म्हणून वाढत्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. माझा जन्म त्या परंपरेत झाला जी हजारों वर्षांपासून निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन जगत आहे. मी जंगल आणि जलाशयांचे महत्व अनुभवले आहे. आपण निसर्गाकडून संसाधने घेतो आणि निसर्गाची सेवा करतो. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आपल्या रायरंगपुरमधील श्री ऑरोबिंदो इंटीग्रल शाळेतील शिक्षक असलेल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. श्री ऑरोबिंदोंनी मला प्रेरित केल्याचं त्या सांगतात. तसेच भारताने 75 वर्षांत ‘एक भारत–श्रेष्ठ भारत’ निर्माण केला आहे. तर आता स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवात याला आणखी गती द्यायची असल्याचं त्यांनी म्हटलं. मुर्मूंनी पुढे म्हटलं की, नेताजी सुभाष चंद्र बोस, नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद सांरख्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वाभिमान जपण्याचे धडा दिला आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी वेलु नचियार, राणी गाइदिन्ल्यू आणि राणी चेन्नम्मा सांरख्या अनेक वीरांगनांनी राष्ट्ररक्षा आणि राष्ट्रनिर्माणात नारीशक्तीच्या भूमिकेला नवी ऊंची दिली.







