कोल्हापूरहून येणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रारींचा सूर वाढला; अकलूजमध्ये दररोज हजार लिटरपेक्षा अधिक विक्री! दूध खराब झाल्यानंतर ग्राहकांनी तक्रार करायची कोणाकडे? अन्न व औषध प्रशासन झोपले आहे का?
अकलूज 🙁 प्रतिनिधी)दूध हे प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन आहारातील महत्त्वाचे अन्नपदार्थ! लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या घरात दररोज दूध वापरले जाते.
मात्र, याच दुधाच्या गुणवत्तेबाबत आता ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याने अकलूजसह माळशिरस तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
.कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दूध संकलित करून पुणे, बारामतीमार्गे माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये त्याचे वितरण केले जाते.
अकलूज शहरातच दररोज एक हजार लिटरपेक्षा अधिक दूध विक्री होत असल्याची माहिती आहे.
दूध डेअरी, स्वीट होम, हॉटेल्स आणि किराणा दुकानांच्या माध्यमातून हे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचते.मात्र, या दुधाबाबत अनेक ग्राहकांकडून दूध खराब होणे, नासणे आणि वापरण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी केल्या जात असल्याचे समोर येत आहे.
विशेष म्हणजे ग्राहकांनी संबंधित विक्रेत्यांकडे तक्रार केल्यानंतर सुरुवातीला काही वेळा दूध बदलून दिले जाते.
मात्र, त्यानंतर पुन्हा तक्रार केल्यास टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे.
मग ग्राहकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?वाहतुकीपासून विक्रीपर्यंत दूध सुरक्षित राहते का?
कोल्हापूरपासून अकलूजपर्यंत दूध पोहोचण्यासाठी अनेक टप्प्यांतून वाहतूक केली जाते.
या संपूर्ण प्रवासात आवश्यक तापमान राखले जाते का? दूध साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था आहे का? विक्री केंद्रांमध्ये दूध निर्धारित तापमानात ठेवले जाते का? दूध खराब होत असल्याच्या तक्रारींचे नेमके कारण काय आहे?हे प्रश्न आता अनुत्तरित राहता कामा नयेत.
अन्न व औषध प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!
अकलूज शहरातील दूध विक्री केंद्रांची अचानक तपासणी करण्यात यावी. संबंधित दूध पुरवठादारांकडील आवश्यक परवाने, वाहतूक व्यवस्था, शीतसाखळी, साठवणूक आणि दुधाची गुणवत्ता तपासण्यात यावी. ग्राहकांच्या तक्रारींची अधिकृत नोंद घेऊन दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत.दूध खराब असल्याचे आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड का?
दूध विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असताना ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित दूध मिळण्याची जबाबदारी कोणाची? दूध खराब झाल्यानंतर केवळ पिशवी बदलून देणे पुरेसे आहे का? अशा तक्रारींची कायमस्वरूपी दखल कोण घेणार?अन्न व औषध प्रशासनाने आता तरी जागे होऊन प्रत्यक्ष कारवाई करावी.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात .ग्राहकांनीही दूध खरेदी करताना पॅकिंगवरील तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि साठवणुकीच्या सूचना तपासाव्यात. दूध खराब आढळल्यास पॅकिंग, बिल आणि शक्य असल्यास फोटो जतन करून अधिकृत तक्रार करावी.
ही कोणत्याही एका व्यावसायिकाविरुद्धची मोहीम नाही; हा प्रश्न आहे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा, विश्वासाचा आणि अन्नसुरक्षेचा!
📢 ग्राहकांना संघर्ष योद्धा न्यूजचे आवाहन!
अकलूज व माळशिरस तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण खरेदी केलेले दूध खराब आढळले असेल किंवा दुधाच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असेल, तर त्याचा अनुभव, फोटो, व्हिडिओ तसेच उपलब्ध बिलासह संघर्ष योद्धा न्यूजशी संपर्क साधावा. आपली तक्रार आणि अनुभव गोपनीयतेची काळजी घेऊन संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आज आवाज उठवला नाही, तर उद्या ही समस्या आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचू शकते.चला, ग्राहकांच्या आरोग्यासाठी एकत्र येऊया! ✒️ संघर्ष योद्धा न्यूज जनतेचा आवाज — संघर्ष योद्धा न्यूज





