मेडदच्या काळभैरवनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा; भाविकांसाठी तीन दिवस धार्मिक पर्व

मेडद, (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मेडद गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवी यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन शनिवार, २९ ऑगस्ट ते सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.
या सोहळ्यामुळे मेडदसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
.मेडद येथील काळभैरवनाथ मंदिर हे सुमारे ३०० ते ४०० वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते.
भगवान शिवाचे उग्र व रक्षक रूप मानल्या जाणाऱ्या काळभैरवाचे हे मंदिर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ‘नाथ मंदिर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.मंदिराची वास्तुरचना वैशिष्ट्यपूर्ण असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची रचना आहे.
मंदिर परिसरात अनेक प्राचीन विरगळशिल्पे पाहायला मिळतात. गर्भगृहात काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती असून त्यांच्या खाली स्वयंभू पाषाण असल्याचे मानले जाते.
मंदिराच्या परिसरात दीपस्तंभ, तुलसी वृंदावन तसेच विविध प्राचीन पाषाणी मूर्तीही आहेत.
माघी यात्रेला मोठी परंपरा
मेडदच्या काळभैरवनाथ मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात दोन दिवसांची मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान गजीढोल नृत्य हे प्रमुख आकर्षण असते. कुळाचार, नवसफेड तसेच गावावर संकटे येऊ नयेत, चांगला पाऊस पडून भरघोस पीक यावे आणि देवतेचा आशीर्वाद लाभावा, या श्रद्धेतून गजीढोलाची परंपरा जपली जाते . याशिवाय भजन, कीर्तन, पालखी सोहळा, महाप्रसाद, कुस्ती, तमाशा आणि भारूड आदी कार्यक्रमही होतात.
दर रविवारी रात्री ९ वाजता मंदिरात धुपारती केली जाते. यासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित राहतात. धुपारतीनंतर ग्रामस्थांकडून गजीढोल नृत्याचा सरावही केला जातो.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भाविकांना आवाहन
आगामी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र मेडद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माळशिरसपासून सुमारे ६ किलोमीटर, तर नातेपुतेपासून १६ किलोमीटर अंतरावर मेडद गाव आहे. माळशिरस व नातेपुते येथून एसटीची सुविधा उपलब्ध असून खासगी वाहनानेही मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिर परिसरात सध्या निवास व न्याहरीची सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांनी त्याची पूर्वतयारी करावी.






