लक्ष्मी कृपा अर्बन निधी घोटाळा : संशयित संग्राम गोडसे यांना अटकपूर्व जामीन
अकलूज, (प्रतिनिधी) : अकलूज परिसरात ‘लक्ष्मी कृपा अर्बन निधी’च्या माध्यमातून महिन्याला तब्बल ५ टक्के परतावा तसेच आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची ६१ लाख ३६ हजार ६९० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला असून, ‘लक्ष्मी कृपा’ संस्थेशी संबंधित ११ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३१६(५), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम, १९९९ (MPID) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी संग्राम शहाजी गोडसे (रा. यशवंतनगर, अकलूज) यांनी अटकेच्या भीतीपोटी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
त्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता नंदन गवळी यांनी न्यायालयात प्रभावी बाजू मांडली.यावेळी अधिवक्ता गवळी यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की, संग्राम गोडसे हे या कथित गैरव्यवहारातील सहभागी नसून ते स्वतःही या योजनेचे गुंतवणूकदार आणि पीडित आहेत. त्यांनीही ‘लक्ष्मी कृपा’मध्ये स्वतःची रक्कम गुंतविली असून त्यांचीही आर्थिक फसवणूक झाली आहे.
तसेच ते कधीही संस्थेचे संचालक, पदाधिकारी किंवा व्यवस्थापनाचा भाग नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केवळ संशयाच्या आधारे कारवाई करण्यात आली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अधिवक्ता नंदन गवळी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानुसार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी संग्राम शहाजी गोडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान, या कथित घोटाळ्याचा तपास अकलूज पोलीस करत असून, गुंतवणूकदारांची फसवणूक नेमकी कशी झाली, संबंधित आर्थिक व्यवहारांचे स्वरूप काय होते आणि इतर संशयितांची भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला तरी त्यामुळे तपासावर कोणताही परिणाम होत नाही. तपासादरम्यान आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटींसह संबंधितांना दिलासा देण्यात आल्याचे समजते






