शक्तीपीठ महामार्ग विरोधात करकंब येथे भव्य शेतकरी मेळावा; जमीन संपादनास तीव्र विरोध
करकंब (ता. पंढरपूर) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी, नागरिक आणि युवकांना एकत्र आणण्यासाठी २८ जून २०२६ रोजी करकंब येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
“जमीन आमची देणार नाही, संघर्ष आमचा थांबणार नाही” या घोषवाक्याखाली हा मेळावा होणार असून, शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
या मेळाव्यास विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य मा. सतेज (बंटी) पाटील, खासदार मा. राजू शेट्टी, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आयोजकांच्या माहितीनुसार, शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमीन संपादनामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे या प्रकल्पाविरोधात जनमत संघटित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा २८ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता आनंदी-मंगल कार्यालय, करकंब (ता. पंढरपूर) येथे होणार आहे.
शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे नागरिक, शेतकरी बांधव तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
.शेतकरी संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या मते, शेतीची जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे.
त्यामुळे जमीन संपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या भावना आणि हिताचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आगामी मेळाव्यात या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा असून, पुढील आंदोलनाची दिशा देखील निश्चित केली जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर करकंब येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याकडे संपूर्ण परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.







