परवान्याशिवाय सुरू असलेली पिसेवाडी येथील दूध डेअरी बंद; अकलूज मध्ये संशयित पामोलिन तेलाचा साठा जप्त
अकलूज (प्रतिनिधी ): अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी माळशिरस तालुक्यातील वेळापूर परिसरातील एका दूध डेअरीवर कारवाई करून व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अकलूज येथील एका व्यापाऱ्याकडील संशयित पामोलिन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी पंढरपूर–पुणे रोडवरील पिसेवाडी येथील मे. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राची तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित डेअरीकडे अन्न व औषध प्रशासनाचा आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले.
वारंवार सूचना देऊनही परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत सुरक्षित अन्नपुरवठ्याबाबतच्या विविध तरतुदींचे उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.
त्यामुळे संबंधित डेअरीला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, डॉ. लवटे यांनी अकलूज येथील मे. जयकुमार दुलचंद दोशी या व्यापारी पेढीचीही तपासणी केली. यावेळी पामोलिन तेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित 997 किलो वजनाचा व सुमारे 2 लाख 44 हजार 700 रुपये किंमतीचा साठा कमी दर्जा अथवा लेबलदोष असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.
पुढील आदेश मिळेपर्यंत हा साठा विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.अन्न व्यवसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाची अधिकृत नोंदणी अथवा परवाना घेऊनच व्यवसाय करावा तसेच अन्न सुरक्षा कायदा, 2006 मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी केले आहे.
सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थांच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी 9405596340 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा fdasolapur@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.






