अकलूज बाजार समितीचा मोठा निर्णय: आता आठवड्यातून दोन दिवस भरणार जनावरांचा बाजार
अकलूज:(प्रतिनिधी )सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शेतकरी व व्यापारी बांधवांची वाढती मागणी आणि बदलती आर्थिक समीकरणे लक्षात घेऊन, आता अकलूज येथे दर शुक्रवारी आणि दर सोमवारी जनावरांचा तसेच शेळ्या-मेंढ्यांचा भव्य बाजार भरणार आहे.
*मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत निर्णय*
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील (मोठे दादा) यांच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
. या बैठकीस बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, परिसरातील शेतकरी आणि मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
सर्वांच्या संमतीने आठवड्यातून दोनदा बाजार भरविण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. *शेतकरी व व्यापाऱ्यांचा होणार मोठा फायदा*
या निर्णयामुळे माळशिरस तालुक्यातील आणि परिसरातील पशुपालकांना आपली जनावरे विक्रीसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही.
एकाच आठवड्यात दोन बाजार उपलब्ध झाल्यामुळे वेळेची बचत होईल आणि स्पर्धात्मक भाव मिळण्यास मदत होईल.
व्यापारी बांधवांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या उलाढालीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*तालुक्याच्या अर्थकारणाला मिळणार गती*
बैठकीत बोलताना सभापती मदनसिंह मोहिते-पाटील म्हणाले की:”शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आठवड्यातून दोनदा बाजार भरवल्यामुळे केवळ बाजार समितीचीच नव्हे, तर संपूर्ण माळशिरस तालुक्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळेल.
रोख सुलभता वाढल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून येतील.
“या निर्णयामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत असून, आगामी सोमवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू होणार आहे.






