विशेष /प्रतिनिधी भैय्या खिलारे
कौटुविक वादातून नैराश्यात येऊन कंबर तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला सोलापूर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाने धाडसाने मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.
मंगळवार, दि. १४ एप्रिल सकाळी ही थरारक घटना घडली. दामिनी पथकाच्या या तत्परतेमुळे एका महिलेला जीवदान मिळाले.मिळालेल्या माहितीनुसार, विभाग २ चे दामिनी पथक सकाळी १०:५५ च्या सुमारास हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका नागरिकाने पथकाला माहिती दिली की, एक महिला वन विभागासमोरील कंवर तलाव परिसरात आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आली आहे.
माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंबन लावता तलावाकडे धाव घेतली. दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले, तेंव्हा त्या महिलेनेतलावाच्या पाण्यात उडी मारली होती. पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत त्या महिलेला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.
प्राथमिक चौकशीत पती-पत्नीमधील कौटुविक वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि पोलीस निरीक्षक स्नेहा मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जयश्री कोळी, पोलीस शिपाई सुनीता जाधव आणि पोलीस चालक प्रतीक्षा शिंदे यांनी बजावली आहे
.समुपदेशन करून कुटुंबाच्या स्वाधीन जीव वाचवल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचे योग्य समुपदेशन केले. त्यानंतर तिचे पती आणि आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले.
त्यांनाही समज देऊन महिलेला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.






