अकलूज पोलिसांची मोठी कामगिरी; ५० हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
अकलूज : (प्रतिनिधी )अकलूज आणि परिसरातील नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यात अकलूज पोलीस ठाण्याला मोठे यश आले आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण ५० महागडे मोबाईल हस्तगत केले असून, मंगळवार (दि. ७ एप्रिल २०२६) रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर केला. या पोर्टलवर संबंधित मोबाईलचे आयएमईआय (IMEI) क्रमांक ब्लॉक करून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
त्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्रासह परराज्यात तपासाची चक्रे फिरवत एकूण ५० मोबाईल संच शोधून काढले.
आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अकलूज पोलिसांनी ७५ मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत केले होते.
ही कारवाई सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपास मोहिमेत पोलीस अंमलदार तुळशिराम गायकवाड यांनी विशेष कामगिरी बजावली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टेंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.







