*इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे मंडळ अधिकाऱ्याचा कथित भ्रष्टाचार उघड — धक्कादायक पुरावे समोर*
इंदापूर (प्रतिनिधी )इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप समोर आले असून या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून हे अधिकारी येथे असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गैर कृत्ये केल्याचे उघड झाले आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, विविध महसुली कामांसाठी नागरिकांकडून कथितपणे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे आरोप आहेत.
जमीन फेरफार, ७/१२ उतारे, वारस नोंदणी, पीकपाणी नोंदी यांसारख्या नियमित कामांमध्ये मुद्दाम अडथळे निर्माण करून आर्थिक व्यवहाराची अपेक्षा व्यक्त केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
*संघर्ष योद्धा न्यूज पोर्टलकडे धक्कादायक पुरावे*
या प्रकरणात अनेक महत्त्वाचे पुरावे संघर्ष योद्धा न्यूज पोर्टल यांच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
संबंधित पुराव्यात कथित आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातील माहिती असल्याचे सांगितले जात आहे.पोर्टलच्या प्रतिनिधींनी केलेल्या प्राथमिक पडताळणीत काही प्रकरणांत ठरावीक रकमेची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले असल्याचा दावा आहे. मात्र या आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही.
*नागरिकांमध्ये संताप*
लासुर्णे व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“सरकारी कामासाठी पैसे द्यावे लागतात, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी दिली.
काही पीडितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी सादर केल्याचेही समजते. संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ बदली व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
*प्रशासन मौन का?*
या गंभीर आरोपांनंतरही प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसल्याने संशय अधिकच गडद होत आहे. जर आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनासह कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
*पुढील पाऊल काय?*
स्थानिक नागरिक आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत असून, तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. चौकशीअंतीच सत्य स्पष्ट होणार असले तरी,
या प्रकरणाने लासुर्णे परिसरातील प्रशासनिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.






