अकलूज परिसरात अवैध हातभट्टी व बनावट दारू विक्रीला ऊत; उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अकलूज (ता. माळशिरस) – माळशिरस तालुक्यातील अकलूजसह ग्रामीण भागात अवैध हातभट्टी दारू व विना परवाना देशी-विदेशी मद्य विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला वर्ग व तरुण पिढी मोठ्या संकटात सापडली असून, विषारी दारूमुळे मृत्यूंच्या घटनाही घडल्याची चर्चा आहे.
अकलूज येथे कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (माळशिरस) कार्यालय अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर तसेच माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील कामकाज पाहते.
मात्र या विस्तृत कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्रीवर प्रभावी नियंत्रण नसल्याची नागरिकांची तक्रार आहे
.गावोगावी हातभट्टीचे अड्डेतालुक्यातील अनेक गावांमध्ये गल्ली-बोळात एक ते पाच ठिकाणी अवैध दारूची दुकाने सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काही ठिकाणी हॉटेल, ढाबे, पानटपऱ्या तसेच घरातूनही खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसून येते. हातभट्टी दारू ओढ्याजवळ, झाडीमध्ये किंवा दुर्गम भागात तयार केली जाते.
या दारू निर्मितीत युरिया, रासायनिक पावडर, खराब गूळ व इतर केमिकल्स वापरले जात असल्याची माहिती असून, ती प्लास्टिक फुगे, ट्यूब, डबे व बाटल्यांमध्ये भरून विक्रीस आणली जाते.
त्यामुळे ही दारू अत्यंत विषारी बनत असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.तरुण पिढीही व्यसनाच्या विळख्यातस्वस्तात उपलब्ध होत असल्याने हातभट्टी दारूकडे सर्वसामान्य मजूर वर्गाबरोबरच काही महाविद्यालयीन तरुणही आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
परिणामी कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, महिलांवर कौटुंबिक अत्याचार वाढल्याच्या तक्रारी आहेत.कारवाई की दिखावा?स्थानिकांच्या आरोपानुसार, महिन्यातून एकदा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खासगी वाहनातून येऊन काही विक्रेत्यांवर कारवाई करतात; मात्र त्यानंतर संबंधितांना तत्काळ सोडण्यात येते. पकडलेल्या आरोपींवर नेमके कोणते गुन्हे दाखल होतात, किती जणांवर आरोपपत्र दाखल झाले, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिक बळावला आहे.
काही पोलीस ठाण्यांकडून कारवाई होत असली तरी उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“जर अवैध विक्री इतक्या उघडपणे सुरू असेल, तर विभाग नेमका कशासाठी?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील अवैध दारू व्यवसायामुळे सार्वजनिक आरोग्य, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






