शिवजयंतीनिमित्त अकलूजच्या ‘छत्रपती प्रतिष्ठान’चा सामाजिक वारसा; इंदापूरच्या मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हातसलग १० व्या वर्षी ‘अन्नदान हेच श्रेष्ठदान’ उपक्रम उत्साहात संपन्न
अकलूज/इंदापूर:
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज येथील ‘छत्रपती प्रतिष्ठान’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधीलकी जपत एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी इंदापूर येथील मूकबधिर संस्थेमधील विद्यार्थ्यांना अन्नदानासह शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
छत्रपती प्रतिष्ठान गेली नऊ वर्षे सातत्याने “अन्नदान हे श्रेष्ठदान” या उदात्त भावनेतून शिवजयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यंदा या स्तुत्य उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते. या विशेष प्रसंगी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना वह्या-पुस्तके, पेन यांसारखे शालेय साहित्य, दैनंदिन वापराचे स्वच्छता साहित्य आणि पौष्टिक अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर, सहारा इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. डॉ. श्रद्धाताई जवंजाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्षा सौ. शारदाताई चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, इंदापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच संदीप दादा भोसले, पै. रणजित पवार, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष रामभाऊ आसबे, लक्ष्मणजी काळे, भारत यादव, अमित घाडगे, संदीप काळे, मनीष पवार आणि ओंकार शिरसागर आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन व आयोजन छत्रपती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आशुभाऊ ढवळे यांनी केले होते.
इंदापूर येथील मूकबधिर संस्थेचे प्राध्यापक श्री. उन्हाळे सर यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
शिवजयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता समाजातील विशेष गरजा असलेल्या घटकांना आधार देऊन साजरी केल्याबद्दल उपस्थितांनी छत्रपती प्रतिष्ठानचे कौतुक केले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले.






