ग्रामदेवता श्री अकलाईदेवीची यात्रा मंगळवारी
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज ची ग्रामदेवता श्री अकलाईदेवीची यात्रा मंगळवार (ता.२३) रोजी होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या येष्ठ नागरिक, गरोदर व लेकरूवाळ्या महिलांना दर्शनाला उभे राहणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी सोय करणार असल्याची माहिती विश्वस्त स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
ग्रामदेवता अकलाई देवीच्या यात्रेच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी विश्वस्त स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्रीदेवीचे दर्शन, नैवेद्य व प्रसाद यासह इतर व्यवस्थेसाठी समित्या तयार करण्यात आल्या. या बैठकीत विश्वस्त स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला व एक वर्षाच्या आतील बालक असणाऱ्या महिलांना दर्शनाची वेगळी सोय करण्याबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार यावर्षीपासून ज्येष्ठ नागरिक गरोदर व लेकूरवाळ्या महिलांसाठी वेगळी दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे. या बैठकीला सचिव तुकाराम टिंगरे,बाळासाहेब सणस,मोहन गुरव, सर्व सामाजिक मंडळे, सेवाभावी संघटना,सार्वजनिक नवरात्र व गणपती मंडळाच्या पदाधिका-यासह जैन समाजाचे प्रमुख मिहीर गांधी,सतिश व्होरा,वीरशैव लिंगायत समाजाचे विलास क्षिरसागर,उत्कर्ष शेटे, नगरपरिषदेचे सुनिल काशिद,बाळासाहेब वाईकर, बिभीषण जाधव,हेमलता चांडोले,प्रतिभा गायकवाड उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर व लेकरूवाळ्या महिला यांना दर्शनाला उभे राहणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी सोय करणार आहोत.– स्वरूपाराणी मोहिते पाटील, विश्वस्त, अकलाई देवी देवस्थान.









