अकलूज मध्ये राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरु
अकलूज – (प्रतिनिधी )आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या अकलूज शहराला कला, क्रीडा, सांस्कृतिक व राजकीय वारसा लाभलेले तसेच संस्कार व संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळखले जाते.परंतु आता मात्र हे शहर वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध होताना दिसत आहे. शहरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा व्यवसाय खुलेआम सुरू असून, शहरातील मुख्य चौकात व परिसरात वावरताना ये जा करताना नागरिकांची, व्यापाऱ्यांची महिलांची कुचंबणा होत आहे.
एकेकाळी अकलूजनजीक असलेली टेंभुर्णी, पंढरपूर, इंदापूर ही गावे वेश्याव्यवसाय अर्थात देहविक्री करणाऱ्या महिलांबाबत परिचित होती.
मात्र काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्वइच्छेने देहविक्री करणे गुन्हा नसल्याचा निकाल दिल्यापासून अकलूज व परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांचा वावर वाढल्याचे दिसत आहे.
अकलूजच्या मुख्य चौकात व परिसरात वर्दळ पाहायला मिळते.येथे असणारी दुकाने व दवाखाने पाहून काही महिला परिसरात वावरतात व ग्राहकांना हेरून भर रस्त्याच्या कडेलाच त्यांच्याशी हितगूज करताना दिसतात.
अकलूज येथील नवीन बसस्थानक तर या महिलांचा अड्डाच बनला आहे. या परिसरात सुमारे 20ते 25महिला या ठिकाणी असतात. कधी बस स्थानकच्या समोर तर कधी बस स्थानकच्या पाठीमागील बाजूस या महिला उभ्या असतात.या ठिकाणी असलेल्या रिक्षा स्टॉप वरील काही रिक्षा चालक यांचेबरोबर संगनमत करून या महिला इतरत्र जाऊन हा व्यवसाय करतात.
विशेष म्हणजे पोलीस स्थानक हाकेच्या अंतरावरच आहे. तरीही पोलिसांची नजर या महिलांकडे जात नाही. हे विशेष.
तीन मार्च 2024 रोजी दुपारी 1च्या आसपास बसस्थानक परिसरात चार महिला उभ्या होत्या. त्यापैकी तीन महिलांनी भर रस्त्यावरच त्यांच्यापैकीच एक असलेल्या महिलेला फ्रीस्टाईल मारहाण केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याच सुमारास रस्त्यावर मारामारी सुरु असताना या रस्त्यावरून दोन वेळा पोलिसांची गाडी येऊन गेली. त्यावेळी नागरिकांना वाटले पोलीस काहीतरी कारवाई करतील. परंतु पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन तेथून निघून गेले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
अकलूज परिसरात अनेक ठिकाणी नागरी वसाहती मध्ये देखील या महिलांनी खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. त्या ठिकाणी राहून बेमालूमपणे इतरत्र जाऊन या महिला व्यवसाय करीत आहेत.अकलूज परिसरातील काही लॉज व खासगी रूम या महिलांचा अड्डा होताना दिसत आहेत
.त्यामुळे अकलूज चे नाव बदनाम होत आहे.
पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.






