माळशिरस तालुक्यात राजरोसपणे ओपन सुरु असलेला अवैध मटका जुगार क्लोज होणार का
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील नागरिक, महिला, मुले, सुशिक्षित बेरोजगार जलद पैसा मिळविण्याच्या नादात अवैध मटका जुगाराच्या आहारी जाऊ लागली आहेत.माळशिरस तालुक्यातील गाव गाड्यातून तरुणाई मटका, जुगार याच्या आहारी चाललेली दिसत आहे.
काही ठिकाणी पोलीस कारवाई करत असले तरी मटका घेणारे ऑफलाइन किंवा ऑनलाईन मटका घेत आहेत.मटका लावल्यानंतर आज लागेल उद्या लागेल या आशेवर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुणांसह कामगार, रोजंदारी वर काम करणारा छोटा मजूर वर्ग देखील याच्या आहारी गेला आहे.स्थानिक पोलिसांकडून मटका जुगारावर कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई सातत्याने होत नाही.
माळशिरस तालुक्यातील अनेक शहरात, ग्रामीण भागात, गल्ली बोळात, पान टपरीवर, तसेच काहीजण तर फिरून व मोबाईल वरून मटका घेतात. ठिकठिकाणी खुलेआम मटका जुगारांचे छुपे अड्डे तयार झाले आहेत. अनेक भागांमध्ये मटका जुगार फोफावत चालला आहे. फोन मटका तसेच मटका जुगारांचे अन्य ही प्रकार खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या धंद्यातून दररोज माळशिरस तालुक्यात करोडो रुपये ची उलाढाल होत आहे. आकडे लावणाऱ्या लोकांचे टोळकेदेखील या मटका अड्ड्याच्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. मटका जुगार चालवीणारे मालामाल तर खेळणारे कंगाल होत आहेत. क्वचित काही लोकांना मटका लागतो.यामध्ये सर्वात जास्त फोन मटका चालविला जात आहे. फोनमार्फत आकडे लावणे आणि फोनवरच पैशाची बोली लावणे असे प्रकार चालू आहेत. अवैध मटका जुगारांवर काही पोलिसांकडून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ही कारवाई पुरेसी नाही.मटका जुगार चालविणाऱ्यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याने मटका चालक मालकांची मक्तेदारी जोरात सुुरु आहे.
माळशिरस तालुक्यात एक उपविभागीय अधिकारी, अकलूज, नातेपुते, माळशिरस, वेळापूर येथे पोलीस ठाणे तर पिलीव, श्रीपूर, माळीनगर येथे औट पोस्ट आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अकलूज, माळशिरस, वेळापूर येथील पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. नवीन पोलीस अधिकारी रुजू झाले आहेत.
माळशिरस तालुक्यात राजरोसपणे ओपन सुरु असलेला अवैध मटका जुगार क्लोज करण्यात नवीन पोलीस अधिकारी यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






