हार न मानता परिश्रम घेतल्यास यश निश्चित…. डॉ.बाळकृष्ण गायकवाड
अकलूज (प्रतिनिधी )15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 106 वी जयंती श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय,कोथरूड पुणे येथे उत्साहात पार पडली .
यावेळी प्रशाला समितीचे सदस्य प्रमुख पाहुणे डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षींच्या फोटोचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी अपयश आले तरी किंवा कठीण परिस्थितीतही मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक दृष्ट्या आपल्या मार्गापासून दूर न जाता,शांतपणे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत सहकार महर्षींनी कठीण परिस्थितीतही सातवीतून शाळा सोडावी लागली,याचे दुःख न करता वंचितांसाठी शिक्षण प्रसारक मंडळांची स्थापना केली व या शाळेतून हजारो विद्यार्थी घडले असे सांगितले.
त्यामुळे कोणीही पराभव झाला किंवा अपयश आले तर खचून न जाता कठोर परिश्रम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका कुमारी जयश्री जावळे मॅडम यांनी सहकार महर्षींचा आजवरचा जीवनप्रवास कथन केला व सहकार महर्षींची शिकवण जतन करण्याचा सल्ला दिला.
यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनी वैभवी सगर व स्नेहा पवार यांनी सहकार महर्षींच्या जीवनावर आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.जयश्री जावळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कु.लाजवंती जाधव, पालक संघाचे श्री.दातार, सौ.माने,जेष्ठ शिक्षक श्री.मुलाणी सर ,सौ. क्षिरसागर मॅडम,इ.उपस्थित होते.यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने पालक ,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी तिळगुळ वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थीनी कु. मृणाली खोपकर व कु.स्वरा माने यांनी केले तर आभार श्री.कारोटे सर यांनी मानले.














