*मोहिते महाविद्यालयात ब्राह्मणी घारीला जीवदान*(पक्षी अभ्यासक डॉ. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा परिचर लोंढे यांच्याकडून उपचार)
अकलूज: येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर गणपत लोंढे यांच्याकडून जखमी ब्राह्मणी घारीला जीवदान मिळाले. तब्बल आठ दिवसांच्या उपचारानंतर जखमी घार ,लोंढे यांच्या कडून उपचार घेऊन बरी होऊन आकाशात झेप घेतली. आठ दिवसांपूर्वी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयाच्या मागील बाजूस जखमी अवस्थेत पडलेली ही घार सचिव अभिजित रणवरे यांच्या नजरेस पडली. त्यांनी तात्काळ सादिक झारेकरी यांच्या मार्फत शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर गणपत लोंढे यांच्याकडे सुपूर्द केले.
लोंढे यांनी आपल्या विभागातील सहकारी व पक्षी मित्र डॉ. अरविंद कुंभार यांच्याशी संपर्क साधून घारीवर योग्य उपचार केले. अज्ञात कारणामुळे बिथरलेल्या घारीला एकांतात ठेवून, डॉ. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख करत लोंढे यांनी पाणी व खाद्य, तसेच काही प्रतिजैविके देऊन उपचार केले. तब्बल आठ दिवसांनंतर पूर्ण बरी झाल्यावर महाविद्यालयाच्या छतावरून लोंढे यांच्या हातातून ही घार आकाशात झेप घेतली.
आठ दिवस प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत बंदिस्त अवस्थेत असलेल्या ब्राह्मणी घारीने अती वेगाने आकाशात मुक्त भरारी घेतली
. या वेळी पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, सर्प अभ्यासक डॉ. संभाजी भोसले, मारुती गायकवाड, विठ्ठल जाधव हे उपस्थित होते.
*ब्राह्मणी घारीचे वैशिष्ट्ये:*
इतर घारींपेक्षा रूपाने सुबक असल्यामुळे या घारीला ब्राह्मणी घार असे नाव दिले आहे. ही घार बहुदा करून नदी व इतर जलस्थानांच्या तटावर वावरताना दिसते. मासे हे या घारींचे प्रमुख खाद्य असल्याने मासळी बाजाराच्या ठिकाणी बहुसंख्येने आढळतात. इस्लाम धर्मात शुभ मानणाऱ्या या घारीली अरेबियन भाषेत रू- मुबारक असे नाव आहे तर हिंदू धर्मातही या घारीला शुभ मानत क्षेमंकरी असे नाव बहाल केले आहे. शिकारी पक्षी म्हणून ओळखली जाणारी ही घार अकलूज परिसरातील अनेक ऊंच झाडांवर जोडीने घरटी साकारून आपले प्रपंच थाटतानाचे चित्र नेहमी पाहायला मिळते.
चौकट: मी शंकरराव मोहिते महाविद्यालयात सेवेत असताना अनेक जखमी पक्ष्यांवर उपचार केले आहे. उपचारादरम्यान गणपत लोंढे हे मला नेहमी मदत करत असे. याचा उपयोग आजच्या घडीला जीवदान मिळालेल्या घारीला झाला. मरणासन्न अवस्थेत असलेली ही घार मुक्त विहारासाठी उड्डाण घेतल्यानंतर आम्हा सर्वांना झालेला आनंद पारावर उरला नाही. या पूर्वी एकदा अशाच जखमी ब्राह्मणी घारीला उपचार करून जीवदान दिले होते. –डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक








