अकलूज (प्रतिनिधी )माढा तालुक्यातील शेवरे येथे नदीपात्रातून विनापरवाना राजरोसपणे बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.माढा तालुक्याच्या हद्दीत असलेले वाळू तस्कर बेसुमार उपसा करीत आहेत.महसूल विभागाने मात्र याबाबत गांधारीची भूमिका घेतली आहे.
एकीकडे वाळूला सोन्याचा भाव आला असताना महसूल विभागाचे प्रतिनिधी असणारे तलाठी करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तलाठी व कोतवाल हे महसूल विभागाचे कर्मचारी गावपातळीवरील डोळे व कान म्हणून ओळखले जातात. येथील प्रत्येक हालचालीची माहिती त्यांच्याकडून महसूल विभागाला मिळते. शेवरे येथे गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा राजरोसपणे वाळू उपसा सुरू असताना यावर अद्यापकारवाई का होत नाही, महसूल विभागाची या वाळू उपशाबाबत गांधारीची भूमिका का, असा सवाल उपस्थित होत आहे.
वाळूउपशामुळे नदी पात्राला धोका निर्माण झाला आहे.वाळूउपसा सुरू असल्याचे पुलावरून जाताना निदर्शनास येते. राजरोसपणे सुरू असलेल्या या विनापरवाना वाळू उपशावर अंकुश ठेवायचा कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यातील इतरही काही ठिकाणी ओढ्यातुन वाळू उपसा होत आहे.
महसूल विभाग, पोलिसांच्या दुर्लक्षाने नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा रात्रं-दिवस राजरोसपणे सुरु आहे.महसूल व पोलीस यांच्या सहकार्याने हा उपसा सुरु असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.नदीपात्रात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. काळ्या सोन्याची लूट सुरु आहे. महसूल विभाग कोमात, वाळू तस्करी जोमात अशी अवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
काही जणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत.तर काहीजण यांत्रिक बोटी च्या साहाय्याने वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायाची व्याप्ती वाढलेली आहे. काळ्या सोन्याच्या तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे.







