जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जंगी स्वागत.लक्ष नयनांनी पाहिले अकलूजचे रिंगण.हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी.











अकलूज (गणेश जाधव )पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी देहूहून निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटीतील मुक्काम आटोपून निरा नदीवरील पुलावरून सोलापूर जिल्ह्यात अकलूज ला प्रवेश केला. सोलापुर जिल्ह्याच्या सरहद्दीवर या पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवार (ता.२४) रोजी सकाळी ८ वाजता सराटी येथून मार्गस्थ झाला. तत्पूर्वी परंपरेनुसार पादूकांना निरा स्नान घालण्यात आले. निरा नदीत पाणी नसल्याने टँकरच्या पाण्यानेच निरास्नान घालण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. निरा नदीवरील पूल ओलांडून हा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात ८.३० वाजता दाखल झाला. यावेळी स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी, करूणा स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर विद्यापीठ प्रतिनिधी सचिन गायकवाड, एनएसएसचे राजेंद्र वडजे, सह. कुलसचिव सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते
.हा पालखी सोहळा पुढे अकलूज कडे रवाना झाला. यावेळी पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. सराटीच्या पुलापासून ते अकलूजपर्यंतचा चार किलोमीटरचा प्रवास करत पालखी अकलूज मधील गांधी चौकात पोहोचली. या प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनेक सामाजिक संघटना व भाविकांनी वारकऱ्यांना चहापाणी फळे बिस्किटे व नाश्ता वाटप केले. अकलूज येथील गांधी चौकात पालखी आल्यानंतर तेथे अकलूज नगरपरिषदेच्या वतीने तोफांची सलामी व फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.
गांधी चौकातील स्वागतानंतर प्रथेनुसार अकलूज शहरातील विजय चौक, विठ्ठल मंदिर, आंबेडकर चौक, धवलचौक मार्गे सदुभाऊ चौकातील सदाशिव माने विद्यालयच्या रिंगणस्थळी आली. सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण पार पडले.पालखीचा अकलूज येथेच मुक्काम होता.
25रोजी माळीनगर मार्गे बोरगाव मुक्कामी जाणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण पार पडले.दिंड्या पताका, टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष या भक्तिमय वातावरणात मग्न होत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनीही आपल्या सुरेल आवाजात अभंग गायला आणि भक्तिमय आणि आनंदाच्या वातावरणात भरच टाकली.
तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंगगेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग….नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात…. अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात या उक्तीची अनुभूती अकलूज येथे झालेल्या गोल रिंगण सोहळ्यात आली.
ढगाळलेल्या आकाशात फडफडणाऱ्या पताका व टाळ मृदंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकाराम,ज्ञानबा तुकाराम च्या जयघोषात लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन अकलूज येथील गांधी चोकात सकाळी १० वाजता झाले. अकलूज नगर परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात आले. त्यनंतर पालखी सोहळा प्रथेनुसार अकलूज शहरातील विजय चौक, विठ्ठल मंदिर, आंबेडकर चौक, धवलचौक मार्गे सदुभाऊ चौकातील सदाशिव माने विद्यालयच्या रिंगणस्थळी ११.०० वाजता आली. लाखो वैष्णवांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मैदान वैष्णवमय झाले होते. संपूर्ण मैदान फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली माऊली च्या निनादाने भरून गेले होते. सर्व समुदाय रिंगण सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता.
पालखीतील पादुकांचे पूजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहितेपाटील व ऋतुजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रिंगण सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,आ.सचिन कल्याणशेट्टी, , नंदिनीदेवी मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील,आ. रणजितसिंह मोहिते पाटील,आ.राम सातपुते,माजी आ.रामहरी रुपनवर,अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,शिवतेजसिंह मोहीते-पाटील, मुरलीधर मोहोळ,अमेरीकेचे भारतातील दुत माईक हेनकी,चेतन नरुटे, राजकुमार पाटील आदीसह पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प संजय मोरे महाराज,काशिनाथ मोरे महाराज, अजित मोरे महाराज, मधुकर मोरे महाराज, विश्वस्त संतोष मोरे, माणिक मोरे, विशाल मोरे आदी उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यात प्रथम पताका धारकांनी गोल रिंगण धाव घेतली. त्यानंतर तुळशीधारक महिलाभगीणी, विणेकरी यांनी तर टाळकरी यांनी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात रिंगणधाव घेतली. रिंगण सोहळा सुरुवात करण्यापूर्वी स्वाराच्या आश्वाचे पूजन धवलसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर देवाच्या आश्वाचे पूजन आ. रणजीतसिंह मोहिते-पाटील व सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा चे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. यानंतर दोन्ही अश्व वायू वेगाने धावले. क्षणार्धात वार्याच्या सुसाट धावणाऱ्या मानाच्या आश्वांचा लाखो वारकरी, भक्तांनी ग्रामस्थांनी याची देही, याची डोळा थरार अणुभवला.
दररोज कडक उन्हाचा सामना करणाऱ्या अकलूजकरांना आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पालखी स्वागताचा व गोल रिंगणाचा आनंद लुटता आला.
हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
पुणे येथील उद्योगपती एल. बी. कुंजीर आणि देहु संस्थानचे पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने गोल रिंगणावर हेलिकॉप्टर मधून पुष्पगुरुष्टी करण्यात आली.यामुळे वैष्णवांच्या आनंदाला अधिकच उधाण आले.
पालखी वरूणराजाला घेऊन आली
पावसाळा सुरू होऊन दीड महिना सुमारे दीड महिना लुटून गेला तरी पावसाचा एकही ठेम पडला नाही. मात्र रिंगण सोहळा संपताच वरुण राजा बरसला.रिंगण सोहळा संपताच सुरू झालेल्या पावसाने वारकरी ग्रामस्थांची तारांबळ उडाली मात्र वारकरी व गावकरी शेतकरी पाऊस आलेल्याच्या आनंदाने बहरून गेले असल्याने ते भिजत भिजतच रिंगण सोहळ्याच्या मैदानावरून बाहेर पडले.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी तसेच पालखी प्रस्थानापासून दररोज वरून राजाला साद देणाऱ्या वैष्णवांची साद पालखी सोहळा अकलूज मध्ये पोहोचतात मेघराजाने ऐकली व तो बरसला.
पालखी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 338व्या पालखी सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज नगरपरिषद, अकलूज पोलीस ठाणे, पोलीस मित्र परिवार यांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती.ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता.उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शन खाली अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर चोख बंदोबस्त ठेवला होता.






