*कृष्णानंद विद्यामंदिर येथे १ मे साजरा*
(अकलूज वार्ता)-
शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती येथे १ मे *महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन* साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील इ. ९ वी च्या दोन्ही तुकडीतून प्रथम येणाऱ्या कु. सत्यराणी देविदास शिंदे या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती मा. श्री. सर्जेराव राजाराम कदम व सर्व सदस्य , मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत, ध्वजगीत, व महाराष्ट्र गीत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. प्रताप तोरणे सर यांनी प्रास्तविक करताना १ मे या दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती व सदस्य तसेच कु. सत्यराणी शिंदे व तिचे पालक श्री. देविदास शिंदे यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच शाळेच्या खेळ प्रगतीत भर टाकणारी शाळेची विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी हणमंत भांगे हिने १४ वर्ष वयोगटात ” राज्यस्तरीय शालेय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धा 2022-23 मध्ये २४ स्पर्धकांमधून ४ था क्रमांक मिळवित प्रशालेचे नाव राज्यस्तरावर नेले त्याबद्द्ल कु. ज्ञानेश्वरी भांगे व तिचे पालक श्री. हणमंत भांगे यांचाही सत्कार व सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात श्री. सर्जेराव कदम यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांचेही अभिनंदन केले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. गायकवाड मॅडम , तर आभार चेमटे मॅडम यांनी मानले.






