मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अकलूजमध्ये रंगली काव्य मैफिल
अकलूज / प्रतिनिधी – ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त जेष्ठ साहित्यिक कवीश्रेष्ठ वि . वा . शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अकलूज परिसरात विविध संस्थामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला तर तालुक्यातील नामवंत कवींनी काव्य मैफिलीद्वारे कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण केली . छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या, संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या आणि कुसुमाग्रजांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या सर्व मराठी मावळ्यांना शुभेच्छा देऊन शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पा जाधव या होत्या . गणेश शेवरकर व सुवर्णा निंबाळकर यांनी मराठी गीत सादर करुन कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम जाधव आणि हर्ष ढाळे यांनी केले .यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . अध्यक्षस्थानी डॉ.बाळासाहेब मुळीक होते. ग्रामीण कथाकार तानाजी बावळे (वेळापूर) यांनी त्यांच्या ग्रामीण कथाकथनाने सुरुवात केली. ग्रामीण विनोदी कथाकथन करून ग्रामीण मराठी भाषेची माहिती ग्रामीण ढंगात सांगून कालबाह्य होणारे मराठीतील शब्दाचे अर्थ सांगत त्यांनी कथा सादर केल्या. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.यावेळी अभ्यासकेंद्रातील सर्व समंत्रक व विद्यार्थी उपस्थित होते.स्माईल एफएम ९८ . ८ च्या वतीने जेष्ठ पत्रकार व भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नामवंत कवींची काव्य मैफिल घेण्यात आली . या मैफिलीत डॉ पांडुरंग नलवडे , जयंत बोबडे , डॉ प्रेमनाथ रामदासी , तानाजी बावळे , विरेंद्र पतकी , मारुती गायकवाड , भाग्यश्री शेळके , समाधान देशमुख , पल्लवी पत्की , अनिल गेळे या कवींनी काव्यपुष्पा द्वारे कुसूमाग्रजांना आदरांजली वाहिली व मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला . या काव्यमैफलीचे सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले तर आभार स्माईल एफएमचे हेड शंकर बागडे यांनी मानले .







