अकलूजची तरुणाई माव्याच्या विळख्यात
अकलूज (प्रतिनिधी )मानवी आरोग्याला घातक असतानाही अकलूज आणि परिसरात अनेक पानटपऱ्यांवर , सुगंधी गोड मावा, तंबाखू मिश्रित मावा राजरोस विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे..आरोग्यास घातक असल्याने मावा विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शहरात होत नसल्याचे चित्र आहे. अनेक पान टपऱ्यांवर मावा मिळतो. . मावा शरीरासाठी घातक आहे. तरीही मावा जास्तीत जास्त ‘स्ट्राँग’ करण्यासाठी त्यात अनेक पदार्थांची भेसळ केली जाते. ही भेसळ शरीराला अपायकारक ठरते. माव्यात निकृष्ट दर्जाचा चुना, सुपारीचाही वापर केला जातो.काहीजण माव्यात रासायनिक द्रव्ये, तसेच इतर काही पदार्थ यांचा वापर करत असल्याचे बोलले जातं आहे. मावा व्यसनाच्या आहारी अनेकजण गेले आहेत. त्यांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, राजरोसपणे मिळणाऱ्या या पदार्थांमुळे सरकारच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. तंबाखू, मावा खाणाऱ्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. हा आजार झाल्यानंतर त्याचे खर्चिक उपचार अनेकांना पेलवतही नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने मावा विकणाऱ्यांना जरब बसण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.तरुण, प्रौढांसह आता लहान मुलंही माव्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मोठ्यांचे अनुकरण करत काही शाळकरी, महाविद्यालयीन मुलंही मावा खावू लागली आहेत. या व्यसनाचे शाळकरी मुलांमध्ये वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.अकलूज परिसरात अनेक शाळा, महाविद्यालय परिसरात मावा विक्री केली जाते. त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अकलूज मध्ये नामवंत शाळा, महाविद्यालय असल्यामुळे परिसरातील ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणासाठी अकलूजला येत असतात. एखाद्या मित्राच्या आग्रहावरून सुरवातीला नको म्हणत ही मुले मावा खात आहेत. शिवाय एखाद्या पान टपरीतून मावा खरेदी करून त्या माव्याची नशा आणणारी विशिष्ट चव असल्यामुळे व या चवीचा मावा इतर ठिकाणी मिळत नसल्यामुळे ही मुले ठराविक पान शॉप मधील मावा खरेदी करीत आहेत. अनेक तरुण या माव्याच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे.काही पान टपरीत हा मावा 10रुपयांना मिळतो. तर काही ठिकाणी 30रुपये ला मिळतो. एवढेच नव्हे तर काही पान टपरी मध्ये आमच्याकडे मावा मिळतो. असे फ्लायर देखील लावण्यात आले आहेत.काही स्वार्थी दुकानदार आपल्या आर्थिक स्वार्थासाठी या माव्यात विशिष्ट रसायन मिसळत आहेत.परंतु हा मावा खाणाऱ्या ना मात्र अनेक आजाराना तोंड द्यावे लागत आहे.अकलूज आणि परिसरात अनेक पान दुकाने मावा विक्रीसाठी फेमस आहेत. या ठिकाणी मोठी पाटी भरून मावा तयार केला जातो. तर काही ठिकाणी प्लास्टिक भरणीत भरून ठेवला जातो. तसेच काही ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशवीत भरून तो विकला जातो.एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तर केवळ त्या दुकानावर किरकोळ कारवाई केली जाते. परंतु दुकानाच्या मूळ मालकावर कारवाई करण्याऐवजी दुकानातील कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातं आहे.काही दुकानात मावा विक्री तुन दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. तर पूर्ण शहरात मिळून दररोज लाखो रुपये ची उलाढाल होत आहे.काही दुकानदार या माव्यात भलतेच रसायन मिसळत आहेत. त्यामुळे खाणाऱ्यांचा मात्र जीव धोक्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरु करून मावा विक्री करणाऱ्या दुकानावर कठोर कारवाई करायला हवी.अशी मागणी जोर धरू लागली आहे.






