प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित नियमित क्रीडा प्रशिक्षण शिबीर उद्घाटन समारंभ संपन्न
ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय खेळातील कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने खेळाडूंसाठी वर्षभर *नियमित क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, शंकरनगर येथे आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, कबड्डी या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी मंडळाच्या वतीने या खेळातील तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर शिबिराचे उद्घाटन व मैदानाचे पूजन युवा नेतृत्व मा.चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 7सप्टेंबर रोजी पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील (काकासाहेब)व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री. अरविंद वाघमोडे सर यांनी केले. त्यांनी या प्रशिक्षणाचा हेतू व उद्देश सांगून आपली ध्येये, आवड, विचार, आरोग्य, निश्चित करण्यासाठी तसेच मानसिक, बौद्धिक, शारीरिक सुदृढतेसाठी जीवनात खेळातील सहभागाचे अत्यंत महत्व असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात तालुक्यातील ६८ मुले व ५१ मुली असे एकूण ११९ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. वर्षभर हे क्रीडा शिबीर सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत घेण्यात येणार आहे. या समारंभास मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रताप पाटील, सचिव श्री. पोपट भोसले पाटील, संचालक ,सदस्य, प्रशिक्षण प्रमुख श्री.संजय राऊत, अर्जुन बनसोडे, तानाजी शिंदे, खेळाडू, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्री. यशवंत माने देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रमसिंह बागल, नागनाथ फिरमे यांनी परिश्रम घेतले. उदघाटन समारंभानंतर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणास सुरुवात झाली.













