*अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेत देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न.*
संग्रामनगर दि.६ (केदार लोहकरे याजकडून)शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय अकलूजमध्ये देशभक्तीपर समूहगीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये आठ समूहगीते सादर करण्यात आली.यामध्ये १२० मुलींनी सहभाग घेतला होता.आणि शाळेच्या वाद्यवृंदातील मुलींनी या गीतांना संगीताची साथ दिली.सदर स्पर्धेत मेरा कर्मा तू या समूहगीताने प्रथम क्रमांक मिळविला.वंदे मातरम या गीताने द्वितीय तर हा देश माझा या गीताने तृतीय क्रमांक मिळविला.ऐ मेरे वतन के लोगो या समूहगीताने विभागून तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबरच आपल्या कला-गुणांना वाव दिला पाहिजे.त्याचबरोबर जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी कला,क्रीडा,सांस्कृतिक व गुणवत्तेमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुश्री जैन यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रशाला समितीच्या सदस्या हेमलता चांडोले,ज्ञानेश्वर शेलार,पर्यवेक्षक के.डी.सूर्यवंशी,शिक्षक प्रतिनिधी वाय.के.माने-देशमुख,संगीत विभाग प्रमुख सुहास पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. या स्पर्धांचे परीक्षण गायत्री जामदार व अजिंक्य नवगिरे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय जाधव यांनी केले तर पर्यवेक्षक के.डी.सूर्यवंशी यांनी आभार मानले.










