अकलूज उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!किरकोळ कारवायांचा गाजावाजा, मोठ्या माशांवर कारवाई कधी? जप्त मुद्देमालाचे पुढे काय होते? क्रमशः. भाग -1.
अकलूज :(प्रतिनिधी )अकलूज येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असून या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते तसेच माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसराचा समावेश असल्याची माहिती आहे.
या कार्यक्षेत्रात अवैध मद्यविक्री, हातभट्टी दारू, बेकायदेशीर मद्यसाठा आणि वाहतूक यांसारख्या प्रकारांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया केल्या जातात.
मात्र, या कारवायांच्या स्वरूपाबाबत आणि परिणामकारकतेबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करून आपली कामगिरी दाखवली जाते; मात्र अवैध मद्यव्यवसायाच्या मोठ्या साखळीपर्यंत तपास पोहोचतो का? या व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांवर कारवाई होते का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत.
एखादी मोठी कारवाई झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रकारांना बोलावून जप्त मुद्देमालाची माहिती दिली जाते.
मात्र, कारवाईनंतर जप्त केलेल्या मद्यसाठ्याचे काय केले जाते? त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? किती मुद्देमाल नष्ट केला जातो? किती प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत? याबाबतची माहिती सार्वजनिक केली जाते का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
केवळ कारवाईचा गाजावाजा नको, तर कारवाईचा परिणामही दिसला पाहिजे!उत्पादन शुल्क विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कारवायांचा वार्षिक तपशील, जप्त मुद्देमाल, त्याच्या विल्हेवाटीची प्रक्रिया, दाखल गुन्हे आणि दोषसिद्धी झालेल्या प्रकरणांची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या विभागाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेणारी ही शोधमालिका… **क्रमशः.भाग -1







