
अकलाई देवी अख्यायीका- सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी अकलूज हे गाव वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता ‘श्री अकलाई देवी’च्या नावावरून पडले आहे. हे गाव मोगल काळामध्ये असतपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन दिवस या ठिकाणी वास्तव्यास होते.सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.अकलाई देवीचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजवीकडे उत्तर दिशेला नीरा नदी वाहते. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा नीरा नदीस जाऊन मिळतो. अकलाईच्या मंदिराच्या सभोवताली भिंतीचे कुंपण आहे. पूर्वेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना एक पायरी आहे बाजूला असलेल्या पाईपमधून पायरी खाली पाणी पडते, आणि भाविकांना तेथूनच जावे लागते. त्यामुळे पाय धुऊन आत गेल्याने परिसर खराब होत नाही. आत गेल्यावर हिरव्या कापडाचे आच्छादन आहे. मंदिरासमोर खाली चबुत-यावर गाभा-याकडे तोंड करून बसलेल्या नंदीचे अप्रतिम शिल्प आहे. मंदिरासमोर आयताकृती सभामंडप आहे. सभामंडपाच्या आत डाव्या आणि उजव्या भिंती जाळीदार आहेत. गाभा-याची इमारत अष्टकोनी असून, छत बाहेर काढून त्याचा सज्जा बनवला आहे. त्यावर उत्तरेला व दक्षिणेला गोमुखाचे शिल्प आहे.स्वच्छ प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्या आहेत. पुढे उतरत्या क्रमाने तीन शिखरे आहेत. प्रत्येक शिखरावर नऊ असे सत्तावीस कळस आहेत. कोणत्याही दिशेने मंदिराच्या शिखराकडे पाहिल्यास, एकापुढे एक चढत्या क्रमाने असलेल्या तीन शिखरांवरील तीन कळस डाव्या बाजूचे एक व उजव्या बाजूचे एक असे पाच कळस दिसतात. त्यांपैकी मधला उंच कळस सामाईक असून, तो कोणत्याही दिशेने दिसतो. सत्तावीस कळस हे सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत डाव्या बाजूला भव्य दीपमाळ दिसते. त्यासाठी घडीव दगडांचा वापर केला आहे.आषाढी पौर्णिमेनंतर प्रथम येणा-या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची यात्रा भरते. त्याला देवीचा भंडारा असे म्हणतात. त्या दिवशी अकलाई मातेस मंगलस्नान, पंचामृती अभिषेक झाल्यावर महावस्त्र परिधान केले जाते. देवीला शृंगार करून महाअलंकार, महापूजा, महाआरती झाल्यानंतर तोफांची (दिवाळीतील विशिष्ट फटाक्यांना तोफा म्हणतात.)नयनरम्य अशी आतिषबाजी करण्यात येते.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा या काळात देवी मातेची दुग्ध स्नान, सुगंधी स्नान आदी विधिवत पूजा करण्यात येते. दशमीला सायंकाळी सीमोल्लंघनास सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला देवीची महापूजा व अलंकारपूजा केली जाते.अकलाई देवी मंदिराची प्रदक्षिणा करताना, मंदिराच्या मागील बाजूस काही देवदेवतांचे स्थान नजरेस येते. मंदिराच्या परिसरात सुंदर असा बगीचा तयार करण्यात आला आहे. मोठ्या वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यांच्या बुंध्यांभोवती पार बांधले असून तेथे भाविकांना विसावा घेता येतो.मंदिराच्या उजवीकडून जुना दगडी घाट नीरा नदीपर्यंत उतरत जातो. भाविक त्या घाटावरून नदीच्या पात्राजवळ जातात. तेथे नदीची पूजा करतात. घाटावर उभे राहिले असता, नदीच्या पलिकडील इंदापूर तालुक्यातील परिसर नजरेस पडतो.अकलाई देवीच्या मंदिरामागून वाहणा-या ओढ्याजवळ मोठा पूल तयार करण्यात आला आहे. त्या पुलावरून थेट मंदिराच्या पश्चिम दिशेला असणा-या यादवकालीन भुईकोट किल्यापर्यंत जाता येते. त्या किल्याची पडझड झालेली असताना त्याची डागडुजी करण्यात आली. त्याचे बाहेरुन तटबंदी असलेल्या बागेमध्ये रुपांतर केले गेले. त्यानंतर 16 जून 2008 रोजी विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या किल्ल्याचे रुपांतर ‘शिवसृष्टी’मध्ये केले गेले. तेथे शिल्प आणि भित्तीशिल्पांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभा करण्यात आला आहे. अकलूज चे ग्रामदैवत असलेली अकलाई देवी जागृत देवस्थान असून, नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे . म्हणूनच आजही पंचक्रोशीत अपत्य जरी जन्माला आले. तरी पहिल्यांदा अकलाई मातेच्या चरणी त्याला आणलं जातं.अकलूजमध्ये ग्रामपंचायत असली तरी कोणत्याही मोठ्या शहरांशी स्पर्धा करेल अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. राजकीयदृष्ट्या कायम सत्तेत राहिल्याने याचा फायदाही या गावाला मिळाला. पण येथील आजचे मंदिर पाहिले तर एवढ्या गोंगाटात देखील अतिशय शांत आणि पावित्र्य जपत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.निसर्गाच्या सानिध्यात वसलेली अकलाई मातानीरा नदीच्या काठावरील शांत भागात अकलाई माता अकलूज मध्ये विसावली आहे . मंदीराच्या प्रवेशाच्या ठिकाणी भव्य कमान, अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीने बांधलेले दगडी मंदिर, उंच कळस, समोरची भव्य दगडी दीप माळ, संपूर्ण मंदीर परिसर संरक्षक भिंतीने बंदिस्त केलेला, मंदीराच्या वाटेवर पायघड्या घातलेले बारीक हिरवे गवत, पायऱ्या चढून गेल्यावर उभारलेला भव्य सभा मंडप आणि गाभाऱ्यात अकलाई मातेची प्रसन्न मूर्ती… हे सर्व पाहताच कोणत्याही भाविकाचं मन हरपून जातं.मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याच्याखाली विविध आकाराचे कट्टे बनवले आहेत. या ठिकाणी भाविक सावलीत या रमणीय ठिकाणाचा आनंद घेऊ शकतात . पूर्वीचे मंदीर हे अतिशय छोटेखानी आणि मातीचे बांधलेले होते.पूर्वजांच्या सांगण्यानुसार 1000 ते 1200 वर्षांपूर्वीचे हे मंदीर असल्याचं बोललं जातं. काशी खंडात देखील या मंदिराचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना जुन्या मंदीराचे तैलचित्र या ठिकाणी लावण्यात आले आहे.सध्या या मंदिराचा कारभार ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येतो. बांधकामासाठी आतापर्यंत 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दर्शनाला आणि मुक्कामाला येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा उभारण्यात आली असून, अजूनही 5 ते 6 कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत .देवीच्या अख्यायिकापुराणकाळात अंकलेश्वर हा दानव ऋषी मुनींना त्रास देऊ लागल्यानंतर त्यांनी पार्वती मातेची आराधना केली. आणि पार्वती मातेने अकलाई देवीचे रूप घेऊन या अंकलेश्वराचा या परिसरात वध केल्याची मूळ कथा या मंदीराबाबत सांगितली जाते.काही वर्षांपूर्वी नीरा नदीला पूर आला होता. यावेळी जनावरे चरणाऱ्या गुराख्याच्या गाईच्या पायात काही तरी अडकल्यावर त्याने हे काय म्हणून पाहताना, ही अकलाई मातेची मूर्ती आढळली.गुराख्याने ती बाहेर काढली. त्याचवेळी गावच्या पाटलाला देवीने दृष्टांत देत आपल्याला अकलूजमध्ये स्थापन करण्यास सांगितल्यावर शेकडो वर्षांपूर्वी हे मंदिर उभारल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र पुराणातील काशी खंडासोबत यादवकाळ आणि छत्रपतींच्या काळात देखील अकलूजचा उल्लेख आढळतो.या मंदीराला नवरात्राच वेगळंच सौंदर्य लाभतं. आश्विन शुद्ध नवरात्रात नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे केले जातात. कोजागिरीपूर्वी 3 दिवस देवी मंचकी निद्रेला जाते आणि कोजागिरीला दुधाचा नैवेद्य दाखवून देवीला जागे करण्यात येते. यानंतर गावातील भाविकांच्या वतीने महाप्रसादाचं, भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं.सध्या या मंदिरा चा कारभार ट्रस्ट मार्फत पाहिला जातो. कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शना खाली या मंदिरात नंदू गुरव हे मंदिराचे काम पाहतs आहेत.









